कोल्हापूर दिनांक 6 – ऐतिहासिक दसरा चौक हा आजकाल कायमच गजबजलेला असतो.कारण परगावच्या येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून मोफत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे इकडे भरपूर प्रमाणात वाहने पार्क केली जातात त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची पार्किंगची चांगली सोय झाली आहे.परंतु अलीकडे काही चारचाकी मिस्त्री,तसेच स्क्रॅप वाल्यांनी सुध्दा स्टेट बँकेच्या कंपौंडला लागून असणाऱ्या जागेत गाड्या आणून बेवारसपणे लावायला सुरू केले आहे.याकडे प्रशासनाचे दिवसाउजेडी लक्ष कसे नाही? याबद्दल नागरिकांच्यातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.उद्या अशीच वाहने पडून राहू लागली तर येणाऱ्या पर्यटकांना गाड्या लावायला मिळतील का? तसेच यामुळे येथे प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.दसऱ्यासारखा शाही सोहळा याच जागेत प्रशासनाच्या वतीने साजरा केला जातो,त्यामुळे किमान या जागेचे पावित्र्य तरी जपले जावे ही किमान अपेक्षा आहे.त्यामुळे शहर वाहतूक विभाग आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने यावर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.या गोष्टीकडे प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असल्याचे दिसते.