कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, योजना व उपक्रमांचे फलक दर्शनी भागात लावावेत, यासाठी सर्वच संबंधित कार्यालयांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत, अशा आषयाचे लेखी निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.
राज्य व केंद्र शासनाच्या सर्व परिपत्रकांची व अध्यादेशांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी म्हणून, शासन प्रयत्नशील असते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य शासकीय, निम शासकीय तसेच अनेक खाजगी कार्यालयामध्ये त्याचबरोबर संस्थांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येते.
बहुसंख्य शासकिय कार्यालयाच्यावतीने सर्वसामान्य जनतेसाठी राबविल्या जाणाऱ्या शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती दर्शनी भागात लावलेली नसल्यामुळे, संबंधित सर्वसामान्य जनतेपर्यंत या लाभाच्या योजनांचा व उपक्रमांचा प्रचार व प्रसिद्धी झालेला नाही.
त्याचबरोबर जर एखादा लाभार्थी, संबंधित कार्यालयाकडे योजना व उपक्रमांची माहिती विचारण्यास गेला तर, त्यांना संबधित कार्यालयाकडून ऑनलाईन वेब साईट तपासा व माहिती घ्या, असा उपरोधिक सल्ला दिला जातो.
कोल्हापूर जिल्हा हा बहुतांशी ग्रामीण भागाशी जोडला गेला आहे. सध्या महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट सुरु आहे याबाबत देखील चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती समज देणे आवश्यक आहे.
एकूणच शासन आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच कार्यालयामध्ये त्यांच्याशी संबंधित योजना व उपक्रमांचे फलक दर्शनी भागात लावून, शासनाचा हेतू व उद्देश सफल व्हावा, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला लाभ मिळेल. अशी आग्रही मागणी संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी निवेदनाद्वारे केली असलेचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यावेळी शिष्ट मंडळामध्ये संजय सासने, संभाजी थोरात, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, भगवान माने, संतराम जाधव, बाळासाहेब कांबळे, रावण समुद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.