कोल्हापूर दि.१७ : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. यशस्वी पाठपुरावा करून निधी मंजुर केला जात आहे. असे असताना मिळालेल्या निधीतून विकास कामे तातडीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण होते, अशाने कोल्हापूर शहराचा विकास अधिकच खुंटणार असून, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी कामाची क्षमता वाढवावी. मंजूर झालेले प्रकल्प पूर्ण करण्याकरिता प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजनासाठी व देखरेखीसाठी स्वतंत्र प्रभारी प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत, अशा सुचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सन २०२२- २३ मधून पंचगंगा स्मशानभूमी विकसित करणे या कामास रु.२.३० कोटींचा निधी मंजूर झाला असून, निधीतून पंचगंगा स्मशान भूमी येथे सुरु असलेल्या आणि प्रस्तावित कामांची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली.
सुरवातीस पंचगंगा स्मशान भूमी येथे सुरु असलेल्या कामाचा श्री.क्षीरसागर यांनी आढावा घेतला. माहिती देताना शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी, सध्या पंचगंगा स्मशान भूमी येथे ५३ बेड उपलब्ध असून, २४ बेड वाढविण्याचे काम सुरु आहे. मंजूर निधीतून पंचगंगा नदी बाजूला स्मशान भूमी अतिरिक्त बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी श्री.क्षीरसागर यांनी जुन्या स्मशानभूमी लगत ६० फुटाची जागा संपादित करून या ठिकाणी वाढीव बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची सद्यस्थिती काय आहे अशी विचारणा केली? यावेळी जागा संपादनाचा प्रस्ताव नगर रचना कार्यालयास पाठविण्यात आल्याचे सांगितले. यावर श्री.राजेश क्षीरसागर यांनी नगर रचना विभागाच्या श्री.मस्कर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिली.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शासनाचे निर्देशानुसार काम करणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे मंजूर झालेला निधी, योजना प्रलंबित राहतात. योजना व निधी मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी जीवाचे रान करतात पण, योजनेचे कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करतात, याकडे प्रशासनाचे नियंत्रण नसते आणि योजना रखडली जाते. याचे उत्तर लोकप्रतिनिधींना जनतेस द्यावे लागते. सद्यस्थितीत शहरात रंकाळा तलाव, रस्ते विकास, दुध कट्टा संवर्धन, हुतात्मा पार्क सुशोभिकरण सह विविध विकास कामे सुरु आहेत. सदर विकास कामांच्या पूर्तता वेळेत होण्यासाठी प्रत्येक प्रकल्पावर प्रभारी प्रकल्प अधिकारी नेमावेत आणि त्यांनी सदर विकास कामाचा पाठपुरावा वेळेत करावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप आयुक्त साधना पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, निलेश हंकारे, रियाज बागवान, कपिल नाळे, अर्जुन आंबी महानगरपालिका अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.