कोल्हापूर दिनांक 23 – देवस्थान समितीचे “भन्नाट” किस्से व प्रकरणे एकेक करून बाहेर येऊ लागल्याने जनतेला देवीच्या “सेवेच्या” नावाखाली “मेवेची” जोडणी कोण कसे लावतेय याची खडान् खडा माहिती समजू लागल्याने जनमानसात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे.बेकायदेशीर नोकर भरती, बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया, साड्यांची पोलखोल,अशा एक ना अनेक भानगडी आता बाहेर येऊ लागल्या आहेत.त्यातच नोकरभरती करून “महादेव” ने नवी कोरी मारुती घेतली असल्याचे समोर आले आहे.6 जणांची बेजमी लावून प्रत्येकी 50 ची जोडणी लावली तरी 3 पर्यंत याची सोय झाल्याने पठ्ठ्याने लगेचच नवी कोरी “मारुती” घेतली अन् देवी पावल्याचा याला भास झाला.तसे पाहिले तर दर्शनाची “खास सोय” याच्याच हातात, सर्वांशी “मिलीभगत” असल्याने सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या खास भाविकांना दर्शन दिले की याची “चंगळ” असते.त्यामुळे जवळपास 60 ते 70 सुरक्षा रक्षक यांच्यासह महिला-पुरुष स्टाफ हाताखाली असल्याने आलटून पालटून जेवणाच्या डब्या सकट याची “सोय” झाली आहे.त्यामुळे प्रत्येक गोष्टीत “अर्थ” शोधण्यात माहीर असणाऱ्या महादेवाच्या “मारुती” साठी चौकशीचा “शनी” मागे लागतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.