कोल्हापूर, दि.23 (जिमाका): पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षम झाले असून रस्त्यांवर होणाऱ्या अपघातासारख्या मानवनिर्मित आपत्तींवरही मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने तलाठी व कोतवाल यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घेण्यात येत आहे, त्याचे उद्घाटन महाराणी ताराबाई सभागृहात श्री.शिंदे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, एनडीआरएफ चे जवान, तसेच जिल्ह्यातील तलाठी व कोतवाल उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापनामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची व प्रात्यक्षिकांची पाहणी श्री शिंदे यांनी केली.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आजवर बऱ्याचदा कोल्हापूर जिल्ह्याला पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. पूरसदृश्य भागातील नागरिक व प्रशासकीय यंत्रणा पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम झाली आहे. सध्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्ते अपघात किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊ नयेत, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने मानवनिर्मित आपत्तीवर मात करण्यासाठीचे प्रशिक्षण द्यावे. तसेच नागरिकांनीही अशा पद्धतीने येणाऱ्या आपत्तींवर मात करण्यासाठी प्रशिक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
एन डी आर एफ चे पथक दिनांक 15 ते 30 डिसेंबर पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी उपस्थित असणार आहे.