दिनांक०५:मानिनी फाउंडेशन आणि सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान आणि स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन लोणावळा येथे हॉटेल रिट्रीट हेरिटेज येथे करण्यात आले होते. संबंधित कार्यक्रमासाठी ‘मानिनी फाउंडेशन आणि सरपंच परिषदेच्या पदाधिकारी,जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,यांना निमंत्रित करण्यात आले होते. पिंपरी,पुणे,,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,धाराशिव,नगर, छत्रपती संभाजी नगर नाशिक,धुळे,जळगाव,मुंबई,रत्नागिरी या विविध भागातील प्रतिनिधींची लक्षणीय उपस्थिती होती.
डॉ. चेतन नरके यांनी आपल्या भाषणामध्ये ‘भारताचा जीडीपी दर वाढण्यामध्ये शेती आणि ग्रामीण उद्योगांचा विशेष सहभाग असल्याचे नमूद केले. कोरोना सारख्या जागतिक महामारीनंतरही जागतिक अर्थव्यवस्थेत शेती उद्योगामुळे भारत आपले अस्तित्व टिकवून आहे. विविध प्रकारची इन्फ्रास्टक्चर मध्ये केलेली गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी देशवासीयांना उपलब्ध करून देण्यामध्ये भारत अग्रगण्य आहे याचा भारतीय म्हणून आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे’.
ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी महिलांनी आणि युवकांनी गटशेती बरोबर गट पशुसंवर्धन करत त्या वरील उपयुक्त लघुउद्योग निर्मिती करावी. भविष्यात लोकल टु ग्लोबल हा विचार गावोगावी निर्माण करत ट्रेडिंग पर्यायाचा वापर करून गाव स्तरावरील उत्पादनासाठी योग्य मार्केटिंग करावी लागणार आहे तरच आपल्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळेल असे मत थायलंड सरकार वाणिज्य सल्लागार डॉ.चेतन नरके यांनी व्यक्त केले.सरपंच परिषदेच्या सर्व सरपंचांच्या माध्यमातून विशेषतः महिलांसाठी आणि युवकांसाठी गावागावांमधून शेती प्रक्रिया उद्योग आणि कुटीर उद्योगाच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. चेतन नरके हे अर्थतज्ञ असून थायलंड सरकारचे वित्त सल्लागार आहेत तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक,युथ डेव्हलपमेंट बँकेचे चेअरमन,भारतीय डेअरी असोसिएशनचे संचालक असून 46 देशांमध्ये विविध संस्थांशी संलग्न आहेत.प्रस्तावना आणि स्वागत मानिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. भारती चव्हाण यांनी केले आपल्या प्रस्तावनेत बोलताना ग्राम विकासामध्ये ग्रामीण भागातील शेती उद्योगांमध्ये महिलांचा 80% सहभाग असतो . शेतीचा दर्जा सुधारणे , शेती प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे , राष्ट्रीय बँकांकडून वित्तीय सहाय्य करणे , महिलांचे क्लस्टर आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून देणे यासारखे कार्य मानिनी फाउंडेशन ग्रामीण भागात करत असून त्याद्वारे ग्रामविकासामध्ये हातभार लावत आहे.सरपंच परिषदेच्या सहकार्याने राज्यभर गावागावांमधून महिलांसाठी शेती कुटीर उद्योगाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती करण्याचे काम अधिक व्यापक होऊ शकते. देशाच्या विकासाचे मूल्यमापन हे त्या देशातील महिलांचा सहभाग आणि विकासावर अवलंबून असते भारतातील महिलांची समान लोकसंख्या बघता आजही लोकशाहीच्या प्रक्रियेतील महिलांचा सहभाग राज्यामध्ये 8.33% तर देशामध्ये 14 टक्के आहे याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. त्याचबरोबर महिलांवर होणाऱ्या वाढत्या अन्याय, अत्याचार, बलात्कार आणि सामाजिक सुरक्षतेविषयी खंत व्यक्त केली . ही परिस्थिती बदलायची असेल तर महिलेचा सन्मान कुटुंबापासून वाढण्याची गरज आहे तिचा सन्मान अधिकार आणि लोकशाहीतीलसहभाग वाढण्याची गरज आहे.मानिनी फाउंडेशनच्या वतीने मुलांसमोर मातेचे नाव जन्म दाखल्यापासून लावावे याची मागणी माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांचे कडे केली असून विविध शहरात आणि जिल्ह्यामधून पत्रकार परिषदा घेऊन जनसामान्यांपर्यंत याविषयीची जागृती करण्याचे कार्य सुरू केले आहे . सरपंच परिषदेच्या पदाधिकारांच्या माध्यमातून सुमारे 28 हजार सरपंचांना याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री जितेंद्र भोसले यांनी सरपंच परिषदेची कार्य आणि भूमिका मांडली. सरपंच परिषदेचे सर्व कार्यकर्ते सामाजिक बांधिलकीतून आपापल्या गावांमध्ये कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. गावचा विकास पूर्णपणे सरपंचाच्या भूमिकेवर अवलंबून असतो .परिषदेच्या सामाजिक कार्यातील सहभागामुळे मानिनी फाउंडेशन ,दीपस्तंभ फाउंडेशन, नाम फाउंडेशन यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्याने गावांच्या विकासासाठी काम करते. अनेक कोटींचे प्रकल्प गावागावामध्ये आणून त्याद्वारे ग्रामविकासाला चालना देण्यात येते शेती उद्योगांमधून पुढील काळामध्ये मानिनी फाउंडेशनच्या बरोबर महिलांच्या स्वयं रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याची आमची भूमिका असेल.
महिलांची सुरक्षितता अधिकार आणि सन्मान समाजामध्ये वाढला पाहिजे तरच देशाचा विकास होऊ शकेल याबाबत आमची सहमती असून डॉ. भारतीताईंनी मांडलेल्या मुलासमोर आईचे नाव जन्म दाखल्यापासून लावावे या ठरावाला सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकमुखाने ठराव मंजूर करत असल्याचे जाहीर केले . त्याबाबतची ठरावाची पत्रे लवकरच मानिनी फाउंडेशन ला देण्यात येतील.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिषदेच्या कार्यकारणी सदस्या सौ सुरेखा दुबल यांनी केले.
नाम फाउंडेशन चे मुख्याधिकारी गणेश थोरात आणि दीपस्तंभचे श्री अमेय जोशी, परिषदेचे मार्गदर्शक श्री शंकर बापू खोपे,परिषदेचे कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वायाळ परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ.जिनत सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सौ उर्मिला मोरे,डॉ. संजय राठोड,श्री संदीप थिटे, यांचे विशेष सहकार्य लाभले. संयोजनासाठी सौ कल्याणी कोतूरकर, सौ सुजाता उरपे,सौ भारती पाटील, कुमारी त्रिशिता चव्हाण,श्री रवी बलांडे,श्री गिरीश महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.