भन्नाट न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, दि.27 (जिमाका):-केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असते. अशा योजनांसाठी वित्तपुरवठा ही महत्त्वाचा घटक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्राथमिक व अन्य क्षेत्रातील लाभार्थ्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वित्तपुरवठा करावा, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक किरण पाठक, आर बी आयचे वित्तीय समावेशन प्रबंधक विश्वजित करंजकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांच्यासह सर्व समिती सदस्य, बँकर्स व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री शिंदे पुढे म्हणाले की, प्राथमिक क्षेत्रांतर्गत सन 2022-23 मध्ये सप्टेंबर 2022 अखेर वार्षिक उद्दिष्टाच्या 67 % उद्दिष्ट पूर्तता झालेली आहे. तर अन्य प्राथमिक क्षेत्राकरिता वित्तपुरवठा करण्याची उद्दिष्ट पूर्तता 49 टक्के इतकी झालेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
बँकांनी 1 हजार 525 कोटी पैकी 1 हजर 494 कोटीचे खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक वाटप केलेले आहे व याची उद्दिष्ट पूर्तता 98 टक्के आहे. त्याप्रमाणेच रब्बी हंगामातही बँकांनी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने खरिप हंगामात उद्दिष्टाच्या 115 टक्के तर बँक ऑफ इंडियाने 95 टक्के पीक कर्ज वाटप केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी या बँकांचे कौतुक केले व इतर बँकांनीही या पद्धतीने काम करावे.तसेच भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या सामाजिक सुरक्षा योजना जसे की प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मध्ये संपूर्ण जिल्हा सामावून घेणेसाठी “विमा सुरक्षित कुटुंब” मोहीम राबविण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.
प्राथमिक क्षेत्रात वित्त पुरवठा करण्यात राष्ट्रीयकृत बँकापेक्षा खाजगी बँका अधिक वित्त पुरवठा करत असल्याचे दिसून येत आहे. तरी राष्ट्रीयकृत बँकांनी शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील तिमाही कालावधी मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा करून आपले उद्दिष्ट साध्य करावे. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील बचत गटांना बँकेमध्ये खाते काढत असताना सर्व सदस्यांचे बँक डिटेल्स अथवा नवीन बँक खाते काढणे ऐवजी गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे बँक डिटेल्स घ्यावेत, तसेच आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे बचत गटांना बँकेत खाते ओपन करत असताना पॅन कार्ड बंधनकारक नाही असे श्री. शिंदे यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी बँक निहाय पीक कर्ज वितरण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, वित्तीय साक्षरता केंद्र, प्रधानमंत्री मुद्रा योजना, इतर मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यासह अन्य सर्व महामंडळे, बँक निहाय ठेवी व कर्ज माहिती आदी बाबतचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
प्रारंभी अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. गोडसे यांनी जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समिती च्या आजच्या बैठकीसमोरील विविध विषयांचे वाचन केले व मागील बैठकीच्या इतिवृत्त समिती समोर सादर केले. तसेच सन 2022-23 साठी कोल्हापूर जिल्ह्याचा वार्षिक पतपुरवठा आराखडा 17 हजार 980 कोटीचा तयार केलेला आहे. यापैकी प्राथमिक क्षेत्रासाठी 10 हजार 780 कोटीचा आराखडा असल्याची माहिती त्यांनी दिली. वार्षिक पतपुरवठा आराखडा 2022-23 अंतर्गत सप्टेंबर 2022 अखेर 14 हजार 469 कोटींचा कर्जपुरवठा झाल्याचे सांगून यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये 2 हजार 722 कोटी चे कर्ज वाटप केले. असून एमएसएमई क्षेत्राला 4 हजार 136 कोटीचे वाटप झालेचे त्यांनी सांगितले. अप्राथमिक क्षेत्रांतर्गत 7 हजार 219 कोटीचे वाटप झालेचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात पीक कर्जा अंतर्गत खरीप व रब्बी हंगामात नोव्हेंबर 2022 अखेर 1 हजार 640 कोटीचे वाटप झाल्याची माहिती त्यांनी दिली