महिनाभर पोलीस प्रशासन वेठीस
भन्नाट न्यूज नेटवर्क
कोल्हापूर दि.25 –
एकीकडे आम आदमी सारखा नवखा पक्ष खड्ड्यात उतरून जनतेसाठी आंदोलन करून एका मागोमाग एक लोकांचे प्रश्न मार्गी लावत असताना कोल्हापुरातील काही तथाकथित कमिशन बहाद्दर आपल्या पक्षाला नेमकी कोणती उभारी देत आहेत? असा प्रश्न कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.एका बाजूला हजारो कोटींच्या आर्थिक फसवणूकीचे गुन्हे होत असताना लोक अक्षरशः हवालदिल झालेले, शेकडो तक्रारी असूनसुद्धा कधी त्यांच्यासाठी यांनी आंदोलन केले नाही.तसेच पाणी,रस्ते, आरोग्य सुविधा शिक्षण अश्या अनेक विभागांतर्गत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित असताना याकडे डोळे झाकून मूग गिळून गप्प बसणारा युवा नेता कोणतेही पुरावे, तक्रारी नसताना केवळ आपल्याला कमिशन कसे मिळेल या लालसेपोटी पोलीस प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.यांच्या पक्षाचे प्रमुख पायाला भिंगरी बांधून पक्ष वाढीसाठी राज्यभर फिरत असताना कोल्हापुरात मात्र त्यांच्या “वाहतुकीला” खिळ घालण्याचे काम काही नेते करीत आहेत.”रिक्षा”त सीट पकडून “इंजिनावर” स्वार होऊन “भागीदार” होण्याची स्वप्ने या “जेंटलमन” युवा नेत्याला पडत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. टवाळखोर नेत्याकडून पक्षाला नेमकी कसली पक्ष बांधणी करायची आहे हे समजत नाही?
कोल्हापूर जिल्ह्याच्या शांततेला वेठीस धरण्याचा हा उद्योग आहे असेच म्हणता येईल.अशा प्रकारच्या आंदोलनाला पक्षश्रेष्ठींची परवानगी आहे का? हा संशोधनाचा विषय आहे.अवैध दारूचा धंदा जिल्ह्यात फोफावला आहे,देशात अवैध दारूमुळे माणसे मृत्युमुखी पडत आहेत. याबाबत आंदोलन होताना दिसत नाही.अवैध धंद्यावर कारवाई झालीच पाहिजे यात काहीच शंका नाही परंतु या अशा आंदोलनात पोलिसांनी नेमकी कोणावर आणि कशाचे आधारे कारवाई करायची हा प्रश्न सुद्धा तितकाच गंभीर आहे.कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मा शैलेश बलकवडे यांचे सारखे कर्तव्यदक्ष आणि वैभवशाली अधिकारी जिल्ह्याला लाभले असताना विनाकारण पोलीस दलाला वेठीस धरून काय साध्य होणार आहे? याबाबत पोलीस दलामध्ये जबरदस्त नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. रस्ता रोको सारखे आंदोलन करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून पक्षाची उरली सुरली वोट बँक सुद्धा नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही.आपला “अर्थ” उरकला की असे नेते बिळात लपून बसतात.जनतेच्या हिताची कामे करण्यापेक्षा यांना आपल्या “अर्थाची” कामे करण्यात धन्यता वाटते.पण त्याना माहित नसते की आपल्या एका चुकीच्या आंदोलनामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होऊन त्याचा फटका पक्षाला बसतो.त्यामुळे या कमिशन बहाद्दर नेत्याचं काम येणाऱ्या काळात पक्षाला उभारी देत की खड्ड्यात घालत हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल,अशी चर्चा होत असल्याचे सुत्रांकडून समजते.