विकासाचा दुसरा अध्याय लिहिण्यासाठी विक्रमसिंह सावंत यांचा प्रचार सभेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जत :मंगळवार दि ५ नोव्हेंबर रोजी विक्रमसिंह सावंत यांनी तालुक्यात असलेले सर्व धार्मिक स्थळी नतमस्तक होऊन प्रचाराचा नारळ फोडला.प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेस माजी मंत्री विश्वजीत कदम,खा प्रणिती शिंदे, कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे चिरंजीव चिदानंद सवदी व महाविकास आघाडीचे प्रवक्ते व पदाधीकारी उपस्थित होते. यावेळी खा.प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या या लोकसभेत जनतेने दाखवून दिले इथे लोकशाही आहे हुकूमशाही नाही. तसेच लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचा. आज प्रत्येक आईला विचार करावा लागतो कि माझी मुलगी कॉलेज वरून सुरक्षित येईल कि नाही हे सांगताना त्यांनी स्वतःचाच अनुभव सांगितला कि मी रेल्वे ने प्रवास करते तेव्हा माझे वडील माझी काळजी करतात जर माझ्या वडिलांना माझी काळजी वाटत असेल तर सामान्य जनतेमध्ये किती भीतीचे वातावरण असेल. तसेच या खोके सरकारने महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवाजी महाराज यांना देखील सोडले नाही महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खालले त्यामुळे तो पुतळा खाली कोसळला. जसा तो पुतळा आतून पोकळ होता तसच हे सरकार देखील पोकळ आहे. यावेळी त्यांनी सोलापूर पॅटर्नची आठवण देऊन इथे जो उपरा उमेदवार लादला आहे भाजपने त्या पार्सलला त्याच्या गावी पाठवा असे आवाहन त्यांनी केले. मला विक्रमदादांसोबत पाच वर्षं काम करण्याची संधी मिळाली. जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विक्रमदादा विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून उपोषण करत होते, असं मी स्वतः पाहिलं आहे. अशी लढणारी माणसं क्वचितच मिळतात.हे सांगून त्यांनी जतकरांना कळकळीची विनंती करून विक्रमदादांना मत देण्याचे आवाहन केले.
यावेळी विक्रमसावंत यांनी सभेस संबोधित करतांना २०१९ ते २०२४ या कालावधीत जत तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रामाणिक प्रयत्न केले, असे सांगितले. जत तालुका राज्याच्या विधिमंडळातील शेवटचा मतदारसंघ असला तरी त्याला राज्यात स्वतंत्र ओळख नव्हती. या पाच वर्षांत २१४ प्रश्न मांडून तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली. अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होते; परंतु विधानसभेत ते आक्रमकपणे मांडून सरकारला त्यावर उपाययोजना करावयास भाग पाडले.
या तालुक्याला काय पाहिजे तर पाणी पाहिजे,आणि त्यासाठी आपण विधानसभेत अनेक वेळा प्रश्न मांडले तसेच आवश्यकता भासल्यास विधानसभेच्या पायऱ्यांवर उपोषण देखील केले आहे. त्या वेळी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणून आपण दोन राज्यांमध्ये जत तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहोत. मात्र, अजूनही ही लढाई संपलेली नाही. जोपर्यंत तालुक्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.
परंतु अडीच वर्षांपूर्वी काही आमदारांना ५० खोके देऊन सरकार पाडले गेले आणि महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आले, ज्यामुळे तालुक्याकडे दुर्लक्ष झाले. आगामी २३ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार येऊन जतसाठी कोट्यवधींचा निधी आणून तालुक्याला सुजलाम-सुफलाम करणार असल्याची ग्वाही दिली.