गणपती गौरीच्या पारंपारिक सणामध्ये आजच्या दिवशी भाजी भाकरी आणि वडीचा नैवेद्य असतो. आपल्या सणांमध्ये खूप मोठा संदेश दिलेला आहे पण तो आपण विसरतो. गौराई अर्थात तुमची लाडकी लेक रोज जंक फूड खाते, अजिबात व्यायाम करत नाही, मैदानावर खेळायला जात नाही अगदी कुठे चालत जाण्याची ही तिची इच्छा नसते. यामुळे तिचे वजन प्रमाणापेक्षा खूपच वाढलेले आहे. केस अकाली पांढरे झालेले आहेत. मासिक पाळीच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. गर्भधारणा होण्यामध्ये लग्नानंतर खूप अडचणी आहेत. हे सगळे कशामुळे तर आपण आपली जीवनशैली पूर्णतः बदललेली आहे. घरी दिवसभर काही ना काही काम करत शारीरिक हालचाली करत राहणे, अंगावर कोवळे ऊन घेणे, केमिकल्स नसलेले शाम्पू सौंदर्यप्रसाधने वापरणे, आई हातची भाजी भाकरी खाणे ,फळे ,कोशिंबिरी खाणे , चालत जाणे, व्यायाम करणे या गोष्टी तुमच्या मुलीने पुन्हा सुरू केल्या तर तिचे आरोग्य चांगले होऊ शकते. ती एक उत्तम करिअर घडवू शकते ,चांगली सशक्त आई बनू शकते आणि याच आरोग्यदायी सवयी आपल्या मुलांनाही देऊ शकते. गौरीचे पारंपारिक खेळ ही त्या काळातील शारीरिक हालचाल होती पण आता या काळात देखील तुमच्या मुलीची लवचिकता वाढवण्यासाठी तिला योगासने जरूर शिकवा. तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन ,संगीत, एखादा छंद जोपासणे याही गोष्टी आयुष्यात असू द्यात. केवळ खूप मार्क मिळवले आणि मोठे पॅकेज मिळाले म्हणजे ती सुखी होणार नाही. आयुष्याला अनेक पैलू आहेत त्या सगळ्या पैलूंना तेवढेच महत्त्व द्यायला शिकवा. तुमच्या गौराईला एक भेट द्या निरोगी जीवनाची!
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक ,कोल्हापूर
7499891805