दि. १९/०९/२०२3:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद भवनात ऐतिहासिक घोषणा केली. महिला आरक्षणासाठी घटनेत दुरूस्ती करणारे विधेयक मांडणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले आहे. पंतप्रधनांच्या या घोषणेमुळे देशातील तमाम महिला वर्गाला राजकीय क्षेत्रात मोठी संधी मिळणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हंटले आहे. खासदार महाडिक यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून, आभारही व्यक्त केले आहेत. देशाच्या इतिहासातील एक अत्यंत मोठी घोषणा करून, पंतप्रधान मोदी यांनी तमाम महिला वर्गाला न्याय दिल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले.
सध्या नवी दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आजपासून नव्या संसद भवनात अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी, महिला आरक्षण विधेयक आणणार असल्याचे जाहीर केले. नारी शक्ती वंदन कायदा या नावाने महिला आरक्षण विधेयक केंद्रीय मंत्री मंडळात मंजुर झाले आहे. लवकरच घटनेत दुरूस्ती करून, हे विधेयक अंमलात आणले जाईल. त्यामुळे देशभरातील महिलांना राजकीय क्षेत्रात मोठी संधी मिळणार आहे. सध्या लोकसभेत महिलांची संख्या १५ टक्क्यापेक्षा कमी आहे. तर राज्यसभेत १४ टक्के महिला प्रतिनिधी आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या महिला आरक्षण विधेयकामुळे, नारी शक्तीला राजकीय क्षेत्रातील आपले कर्तृत्व दाखवता येणार आहे. पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय अभूतपूर्व आणि देशाच्या वाटचालीत क्रांती घडवणारा आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधानांच्या भुमिकेचे स्वागत केले आहे.