दि. १०-०८-२०२३ :सध्या धकाधकीच्या जीवनात आजारपणाला कायमचं दूर ठेवायचं असेल तर अभ्यासाबरोबर खेळाची सांगड घातली पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारांची कास धरणं गरजेचं आहे. तरच शरीर, मन, बुध्दि सक्षम बनेल. याच बळावर विद्यार्थ्यांना भविष्यकाळ सुकर बनवता येईल, असा विश्वास युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉल इथं भाजप, भागिरथी महिला संस्था, मोरया हॉस्पिटल आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित विद्यार्थिनींच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापुरातील दि न्यू एज्युकेशन सोसायटी, भाजप, भागिरथी महिला संस्था आणि मोरया हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं आज राम गणेश गडकरी हॉल इथं शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या पाचवी आणि दहावीतील विद्यार्थिनींचा सहभाग होता. प्रारंभी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा मुख्याध्यापिका एस. आर. चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या सत्कारानंतर क्रीडा शिक्षक महेश सूर्यवंशी यांनी धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागिरथी महिला संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. या शिबिराच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी विद्यार्थिनींशी हितगुज साधलं. तसंच विविध खेळ घेऊन, विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिलं. अभ्यासासोबतच कोणत्याही खेळात विद्यार्थिनींनी सहभागी होणं गरजेचं आहे. आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत खेळामुळं आपल्या शरीराला लाभ होतो. त्यामुळं खेळ आत्मसात करणं गरजेचं आहे. तरच आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल, असं सांगत महाडिक यांनी यू ट्युब चॅनलविषयीदेखील विद्यार्थिनींना माहिती दिली. त्यावर आपण कृष्णराज यांच्या यू ट्युब चॅनलचे चाहते असल्याचं अनेक विद्यार्थिनींनी सांगितलं. भविष्यात देखील या शाळेतील विद्यार्थिनींसोबत वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यासारखे उपक्रम घेणार असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं. दरम्यान विद्यार्थिनींच्या मागणीमुळं कृष्णराज महाडिक यांनी विद्यार्थिनींच्या समुहात जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या. यानंतर मोरया हॉस्पिटलच्या डॉ. प्रगती पोरे, डॉ. शिवानी वेतकर यांच्यासह कर्मचार्यांनी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केली. अनेक विद्यार्थिनींना औषधं देण्यात आली. दरम्यान संस्थेचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांना ऋग्वेद पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचं कृष्णराज महाडिक यांनी अभिनंदन केलं. हॉकी स्पर्धेत राज्य स्तरावर विजेतेपद प्राप्त केलेल्या पद्माराजे हायस्कूलच्या प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच श्वेता पाटील आणि खेळाडूंनी कृष्णराज महाडिक यांची भेट घेऊन त्यांच्याशी हितगुज साधलं. अनेक खेळाडूंनी त्यांची भेट घेऊन खेळाविषयी पाठबळ देण्याबाबत विनंतीदेखील केली. यावेळी उपमुख्याध्यापिका आर. जी. देशपांडे, पर्यवेक्षक वाय. एस. पोवार, पी. एन. सावंत, क्रीडा शिक्षक उमा भेंडेगिरी, वैजू पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.