मुंबई, दि. १९ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी शासनस्तरावरून चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन कुलगुरूंना खुलासा सादर करण्यास कळविण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या खुलाशाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सदर प्रकरण कुलपती म्हणून मा.राज्यपाल यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.सदस्य प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षांचे निकाल उशिरा लावणे तसेच अन्य अनियमित कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. एमकेसीएलला निविदा प्रक्रियेशिवाय दिलेल्या कामाचा अहवाल देखील राज्यपालांकडे देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अन्य बाबी असल्यास समिती नेमण्यात येईल आणि त्याची चौकशी करून राज्यपालांना अवगत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, सतीश चव्हाण यांनी सहभाग घेतला.