भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : गगनबावडा तालुक्यातील पळसंबे येथील 17 वय वर्षे बालिकेचा
बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर व ग्राम बाल समिती, पळसंबे यांच्या संयुक्त विद्यमाने रोखण्यात यश
आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.
गगनबावडा तालुक्यातील पळसंबे येथील बालिका वय वर्षे 17 हिचा बाल विवाह कोडोली येथील एका
युवकासोबत होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष कोल्हापूर यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा
बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून पळसंबे गावातील ग्राम बाल संरक्षण समितीमधील सरपंच, पोलीस पाटील व इतर
सदस्य आणि ग्रामसेवक अरविंद तटकरे यांच्याशी दूरध्वनी व्दारे संपर्क करण्यात आला. त्यानुसार ग्राम बाल
संरक्षण समिती व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी जावून घटनेची पडताळणी केली. यामध्ये बालिकेच्या मोठ्या
बहिणेचे लग्न तिथे वरील कोडोली येथील युवकासोबत करणार असल्याचे निश्चित केले होते. परंतू, बालिकेच्या
मोठ्या बहिणीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याने ती घरातून निघून गेली. त्यामुळे लहान बहिणीचे लग्न या युवकासोबत
करण्याचे ठरविण्यात आले.
बालिकेचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याने ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून पालकांचे
समुपदेशन करुन विवाह थांबविण्यात आला. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांच्या
मार्गदर्शनानुसार ग्राम बाल संरक्षण समिती मधील प्रतिनिधी सरपंच वैशाली गावकर, पोलीस पाटील मधूकर गुरव
व ग्रामसेवक अरविंद तटकरे यांचे तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शन
लाभले.