कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): कोल्हापूर शहराचा तापमानाचा पारा मार्चच्या मध्यावधीतच 36 अंशांवर गेला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भरदुपारी शेतातील व कष्टाची कामे टाळावीतः उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावेत. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात होऊ नये यासाठी आतापासूनच सजग रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी केले आहे.
उष्माघात होण्याची कारणे – उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे. जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. घट्ट कपड्यांचा वापर करणे.
*जागरुक रहा…*
उष्माघात होऊ नये यासाठी आतापासून जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उप केंद्रस्तरावर प्रथमोपचार व उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगाने आवश्यक औषधी व साहित्य सामग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांनी उन्हापासून वाचण्यासाठी सकाळीच महत्त्वाची कामे करुन घ्यावीत. दुपारी घराबाहेर न पडता सायंकाळी 6 वाजल्यानंतर घराबाहेर पडावे. कोणालाही उष्माघाताचा त्रास जाणवू लागला तर तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घ्यावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्रामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
*उष्माघाताची लक्षणे…*
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशद्धावस्था आदी.
*हे करा उष्णतेला हरवा !*
उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, जेवणामध्ये शक्यतो शाकाहारी आहाराचा वापर करावा. तहान नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्या. उन्हात काम करताना ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट चपलांचा वापर करावा. ओआरएस, लिंबू पाणी. ताक यांचा नियमीत वापर करावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सततचा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत, चक्कर येत असल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
सुर्यप्रकाशचा थेट संबंध टाळावा. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा, वेळोवेळी थंड पाण्याने अंघोळ करावी. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आपले घर थंड ठेवा. पडदे, झडपा, सनशेड बसवा. गुरांना छावणीत ठेवा तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे.
*हे करु नका*
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. उन्हाच्या कालावधीमध्ये स्वयंपाक करणे टाळावे.
शिळे अन्न खाऊ नये. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रींक्स घेऊ नका.