कोल्हापूर दि १९ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावातील एक अल्पवयीन मुलगी आणि एक तरुण शनिवारी हातकणंगले-जयसिंगपूर रेल्वे मार्गावर रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळून आले.
याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा आत्महत्येचा संशय आहे. तरुण तारदाळ येथील एका कास्टिंग कंपनीत कामाला होता तर अल्पवयीन मुलगी इचलकरंजी येथील स्थानिक महाविद्यालयात बारावीची विद्यार्थिनी होती.
सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एच.पाटील म्हणाले, “मुलीने शनिवारी सकाळी तिच्या पालकांना ती तिच्या कॉलेजला जात असल्याचे सांगितले. शनिवारी संध्याकाळी काही शेतकऱ्यांनी आम्हाला रेल्वे ट्रॅकवर दोन मृतदेह सापडल्याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तारदाळ येथील पाणी गाळण केंद्राजवळ आम्ही घटनास्थळी गेलो असता तरुणाची दुचाकी आणि मुलीचे ओळखपत्र आढळले. प्राथमिक तपासात हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते मात्र त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली असावी. पुढील तपास सुरू आहे.”
ही घटना उघडकीस आल्यानंतर हातकणगले व शहापूर या दोन्ही ठिकाणचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र हद्द निश्चित नसल्याने गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्यात नोंदवायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शनिवारी रात्री उशिरा शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.