भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचे इन्कोव्हॅक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण
करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून त्यानुसार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरण करण्यासाठी नियोजन
करण्यात आले आहे. लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत करता येणार असून ६० वर्षांवरील
लाभार्थ्यांनी INCOVACC (इन्कोव्हॅक) बुस्टर डोस लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
राहुल रेखावार यांनी केले आहे.
राज्यात कोवीड-१९ आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या व झालेल्या मृत्युचे विश्लेषण केले असता कोविड-
१९ मृत्युचे प्रमाण हे ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये जास्त असल्याचे दिसून येत आहे. यास्तव सध्यस्थितीत
जिल्ह्यामध्ये इन्कोव्हॅक लसीकरण हे फक्त ६० वर्षावरील नागरीकांच्या प्रिकॉशन डोससाठीच वापरण्यात येणार
आहे. याकरीता सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचा-यांचे जिल्हास्तरावरुन
इन्कोव्हॅक (INCOVACC) लसीकरणाचे वर्कशॉप घेण्यात आले आहे.
लसीकरणावेळी नियमित लसीकरण सत्राच्या वेळी उपलब्ध करण्यात येत असलेले एईएफआय किट
उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. INCOVACC (इन्कोव्हॅक) लस पहिल्या टप्प्यामध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्र,
ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपलब्ध करण्यात आले
आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय सीपीआर हॉस्पिटल,
कोल्हापूर या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून जास्तीत- जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण
करुन घ्यावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सुचित केले आहे. जिल्ह्यामध्ये कोविड
रुग्णांमध्ये वाढ होत असून ६० वर्षांवरील लाभार्थ्यांनी खबरदारी म्हणून आपले INCOVACC (इन्कोव्हॅक)
लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन स्वतःचे कोविड आजारापासून संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. योगश साळे केले आहे.