कोल्हापुर दिनांक 19 – वडणगे ता. करवीर येथील तलावालगत असणाऱ्या गोसार वसाहत येथे विघ्नेश पार्क मध्ये करवीर तहसीलदार यांच्या बनावट सही शिक्यांच्या आधारे अकृषक आदेश बनवून व ग्रामपंचायत परवानगी शिवाय बेकायदेशीर बांधकाम करून घरांची विक्री केली असल्याचे उघड झाले आहे.येथील गट क्रमांक 3/1/8 मध्ये असणाऱ्या जागेत संबंधित बिल्डर ने हे बांधकाम करून कायदा धाब्यावर बसविला आहे.
मुळात विघ्नेश पार्क या प्रकल्पाला वडणगे ग्रामपंचायत ने कोणतीही बांधकाम परवानगी दिली नसताना आणि याची कल्पना ग्रामपंचायत ला असताना सुध्दा डोळ्यादेखत हे काम होत असताना ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य का गप्प आहेत ?अशी चर्चा गावात रंगताना दिसत आहे.ग्रामपंचायत ने कोणताही बांधकाम परवाना दिला नसल्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमध्ये कळविले आहे. सदर केल्या गेलेल्या बांधकामाला कोणत्याही स्वरूपाची ड्रेनेज,पाणी ,अंतर्गत रस्ते व्यवस्था न करता बोगस प्रकल्प वडणगेकरांच्या माथी मारला आहे.तिथे लागूनच तलाव असल्याने भविष्यात सांडपाणी तलावात जाण्याची शक्यता आहे.
तसेच या बिल्डरने करवीर तहसीलदार कार्यालयाचे बोगस सही शिक्क्यांचे अकृषक चे आदेश जोडले असल्याचे समजून येते. मग एवढा भ्रष्टाचार होत असताना विद्यमान ग्रामपंचायत समिती “कशामुळे” गप्प आहे हे समस्त गावकऱ्यांना माहीत झाले आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी गावाला वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जाते.याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आंदोलन हातात घेतले असून या प्रकरणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत कारवाई न केल्यास ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबन करण्याची मागणी संघटना करणार असल्याचे समजते.तसेच गावातील कित्येक नागरिकांच्या समस्यांवर ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी दाद देत नसल्याचे समजते.तसेच कागदावर “वजन” ठेवल्याशिवाय पुढील काम होत नसल्याचे चित्र आहे.याबाबत संघटना मजबुतीने उतरणार असून समस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार करवीर येथे आंदोलन करणार असून अशा कोणत्याही प्रकाराला इथून पुढे पायबंद बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.