पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील यशस्वी आयोजन
कोल्हापूर: ‘रस्ता सुरक्षा: एक सामाजिक चळवळ’ हा उपक्रम पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे अत्यंत यशस्वीपणे पार पडला. सातवीपासून बारावीपर्यंतच्या वर्गातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरियन संजीव चिपळूणकर उपस्थित होते. या चळवळीला आर्थिक पाठबळ आणि स्पॉन्सरशिप देणाऱ्या युनिक हिरो संस्थेचे श्री विजय जाधव, तसेच माई हुंडाई आणि माई टीव्हीएस या संस्थांचे श्री राजन गुणे यांचीही उपस्थिती लाभली. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या श्रीमती शिल्पा कपूर मॅम, सर्व शिक्षक-शिक्षिका, आणि शाळेचा संपूर्ण कर्मचारीवर्ग यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान, अमित टोळये यांनी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेतील विविध समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक, खराब रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव, पादचारी सुरक्षेची कमतरता, आणि रस्ता सुरक्षा जागृतीच्या अभावामुळे उद्भवणाऱ्या समस्या यावर चर्चा केली. भारतातील रस्ते अपघातांची गंभीर स्थिती आणि अपघातांमुळे होणारे मृत्यू यांचे सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिणाम त्यांनी स्पष्ट केले.
अमित टोळये यांनी नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सवय लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी आई अंबाबाईची शपथ घेतली की, “आम्ही जबाबदारीने वाहन चालवू, वाहतूक नियमांचे पालन करू, आणि इतरांनाही यासाठी प्रेरित करू.”
भविष्यातील योजना
अमित टोळये यांनी जाहीर केले की, “रस्ता सुरक्षा ही केवळ एक उपक्रम न राहता ती चळवळ बनावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जाईल. यामध्ये ट्रॅफिक पोलिसांसाठी कार्यशाळा, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहामध्ये सहभाग, ट्रॅफिक सिग्नलजवळ सामाजिक प्रयोग, आणि कोल्हापूरमध्ये रस्ता सुरक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा समावेश आहे.”
रस्ता सुरक्षेसाठी नागरिकांची शिस्त आणि जबाबदारी महत्त्वाची आहे. या चळवळीला कोल्हापूरकरांचा पाठिंबा मिळाला, तर शहराला अपघातमुक्त आणि सुरक्षित बनवण्याचे स्वप्न नक्कीच साकार होईल.