मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): आपल्या राज्यात पहिल्यांदाच पुणे येथे होणाऱ्या आर्मी डे परेड 2025 निमित्त येत्या 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिल्या.
मुख्यालय दक्षिण कमान, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली 109 टी.ए. बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात श्री. तेली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी 109 टी.ए. बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट गौरव पवार, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, तहसीलदार सैपन नदाफ, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, सुभेदार राजाराम चोपडे, नायब तहसीलदार नितीन धापसे -पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सैन्य दलातील देशभरातील विविध राज्यातील सेवानिवृत्त अधिकारी व नागरिक सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करुन श्री तेली म्हणाले, या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या आर्मी मधील अधिकारी व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या. वाहतूक व्यवस्था व पोलीस बंदोबस्त द्या. सहभागींना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्या, असे त्यांनी सांगितले.
देशासाठी शहीद झालेल्या शूर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर तर्फे 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरुन एकूण 50 किमीची ही रन असणार आहे, ज्यात कोणालाही कोणत्याही ठिकाणाहून कितीही अंतरासाठी सहभागी होता येणार आहे.
आर्मी डे परेड चे महत्व लक्षात घेवून तो नागरिकांच्या स्तरावर साजरा करण्यासाठी सर्व कोल्हापूरकरांनी या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन 109 टी.ए. बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीच्या वतीने करण्यात आले आहे. गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता शिवाजी विद्यापीठ रोड येथील मिलिटरी स्टेशन (सी एस डी कॅन्टीनच्या बाजूला) कोल्हापूर येथून या विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. मिलिटरी स्टेशन, कावळा नाका, धैर्यप्रसाद चौक, भगवा चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय, महावीर कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, धैर्यप्रसाद चौक (सिंचन भवन चौक) कावळा नाका, शांतीनिकेतन चौक, एअर पोर्ट, पुन्हा परत येत शिवाजी विद्यापीठ परिसरात उर्वरित 50 किमीची धाव पूर्ण होणार आहेत.