कोल्हापूर : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार (ता. ९) पासून (ता. १९) सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेतेमंडळी मेळाव्यासाठी बेळगावकडे रवाना होत आहेत. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
निपाणी पोलिसांच्या वतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर, कागलजवळील दूधगंगा नदीवर नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी (ता. ८) पासून येथे अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोमवारी (ता. ९) बेळगावकडे ‘भगवी फेरी’ काढत आहे. या फेरीत सुमारे ५०० शिवसैनिक, ३० हून अधिक वाहने, आणि भगवे झेंडे यांचा समावेश असेल.
फेरीची सुरुवात करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त ताराराणी चौकातील त्यांच्या पुतळ्यास सकाळी ९.३० वाजता अभिवादन करून होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी शिवसैनिक बेळगावकडे निघणार आहेत.
कर्नाटक सरकारने महामेळाव्यास परवानगी नाकारली आहे. या निर्णयाला शिवसैनिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत असून, कर्नाटक सरकारच्या विरोधाला सामोरे जाण्यासाठी फेरीत सहभागी होणार असल्याचे शिवसेना उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी सांगितले आहे.