कोल्हापूर:-कलानगरी कोल्हापूरच्या ऐतिहासिक शैक्षणिक व सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देणारे जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, प्राचार्य डॉ. गजानन खाडे, माजी प्राचार्य विजय डोणे यांच्या सहित उपप्रचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विभागीय आयुक्तांनी मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजला भेट दिली.
प्रशालेत आयुक्ताचे आगमन झाल्यानंतर प्रारंभी आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासहित उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे
यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सदिच्छा भेटीप्रसंगी आयुक्तानी कोल्हापुरातील समृद्ध ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या प्रशालेतील प्रयोगशाळा तसेच वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला, त्यांना प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांचे कौतुक केले. शिक्षकांचे अध्यापन कार्य पाहिले इतर सोयी सुविधांचा आढावा देखील घेतला. प्रशालेच्या गुणवत्तापूर्ण प्रगती बद्दल आयुक्तानी कौतुक करून यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण व शहरी संस्कृतीचा मिलाफ साधत १७३ वर्षाची गौरवशाली परंपरा हे आजतागायत जपणाऱ्या प्रशालेची माहिती प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर चेैतन्यशील आणि उत्साही बनविण्यासाठी प्रशालेत राबवलेल्या गेलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती व प्रगतीचा आढावा घेत उत्कृष्ट अभिनव कार्यपद्धतीची प्राचार्यांनी माहिती दिली. शैक्षणिक गुणवत्ता जपण्याचा प्रशालेने काटेकोरपणे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.