कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जमिनीचे आरेाग्य अबाधित राहण्यासाठी जगभरात जनजागृती करण्याच्या दृष्टीने 5 डिसेंबर हा दिवस “जागतिक मृदा दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीही 5 डिसेंबर 2024 या दिवशी शेतक-यांना जमिनीच्या आरोग्याविषयक, माती परिक्षणाचे महत्व, जमीन सुपिकता निर्देशांक व जमीन आरोग्य पत्रिका आधारित खतांच्या संतुलित वापराविषयी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय खत वापराचे फायदे या बाबतची माहिती देण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.
पीक उत्पादनामध्ये सहभागी असणा-या घटकांमध्ये जमीन हा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक घटक आहे. सुपिकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादन वाढीस उपयुक्त ठरतात. तथापि अलिकडच्या कालावधीत मात्र शेती व्यवसायातून उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर इत्यादीमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. यामुळे पिकांची खुरटलेली वाढ, उत्पादनाच्या गुणांमध्ये घट, जमीन नापिक होणे, समस्याग्रस्त क्षेत्रांमध्ये वाढ, उत्पादन क्षमतेत वाढ इत्यादी बाबी समोर येत आहेत. जमिनीचे आरोग्य जमीनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असते. जमिनीमध्ये असणारी खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू हे चार घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. जमिनीचे आरोग्य चांगले असेल तरच ती चांगल्या प्रमाणात उत्पादन देते. नत्र, स्फुरद, पालाश ही जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये आहेत. तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. याशिवाय जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन ही सुक्ष्म अन्नद्रव्येही जमिनीत असतात. मानव व पशु, पक्षी यांची अन्नसुरक्षा जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. जमिनीचे आरोग्य संतुलित व शाश्वतरित्या टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी माती परिक्षणाद्वारे जमिनीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.
मृद आरोग्य पत्रिका ही महत्वाकांक्षी योजना सन 2015-16 पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रथम सायकल सन 2015-16 व 2016-17 अंतर्गत 6 लाख 15 हजार 765 मृद आरोग्य पत्रिका व द्वितीय सायकल अंतर्गत सन 2017-18 व 2018-19 अंतर्गत 5 लाख 69 हजार 728 मृद आरोग्य पत्रिका तसेच पथदर्शी प्रकल्पांतर्गत सन 2019-20 अंतर्गत 23 हजार 29 मृद आरोग्य पत्रिका वितरण करण्यात आले असुन या पथदर्शी प्रकल्पांतर्गत गावांमध्ये जमीन आरोग्य पत्रिका आधारित प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले. या माध्यमातून शेतक-यांमध्ये जमिनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करुन हे गाव मॉडेल व्हिलेज करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सन 2021-22 राअसुअ योजनेंतर्गत विविध पीक प्रात्यक्षिक मधील 12 हजार 10 आरोग्य पत्रिका, सन 2022-23 अंतर्गत 12 हजार 733 आरोग्य पत्रिका, सन 2023-24 अंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 8 हजार 640 आरोग्य पत्रिकांचे वितरण शेतक-यांना करण्यात आले आहे.