एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीने धैर्याने एड्सचा मुकाबला करून सुदृढ जीवन जगावे- सिने अभिनेते सागर तळाशीकर
जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
कोल्हापूर, दि. 03 : जागतिक एड्स दिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास संबोधित करताना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले की, एड्स आजाराविषयी वारंवार करत असलेल्या जनजागृतीमुळे एच.आय.व्हीचा प्रसार रोखण्यात तसेच एड्समुळे होणाऱ्या मृत्यूत घट झाल्याचे आढळून आले आहे. 1986 पासून एड्स निर्मूलनासाठी देशात काम सुरू असून आता जिल्ह्यात एड्स नियंत्रणात यश प्राप्त होत आहे. येत्या 2030 पर्यंत एचआयव्हीमुक्त जिल्हा म्हणून कोल्हापूरची नवी ओळख निर्माण होईल असे नियोजन केले जात आहे. यावेळी एड्स रुग्णास सामान्य वागणूक व हक्क देण्याबाबतची शपथ घेऊन आयोजित प्रभात फेरीस प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध पिंपळे, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ.दिपा शिपुरकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली.
नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी घटत आहे आहे याचे समाधान आहे. पण एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीने धैर्याने एड्सचा मुकाबला करून सुदृढ जीवन जगावे असे प्रतिपादन सिनेअभिनेते सागर तळाशीकर यांनी केले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूरच्या वतीने आयोजित केलेल्या प्रभात फेरीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात याही उपस्थित होत्या. पूर्वीपेक्षा एचआयव्ही एड्सच्या उपचार पद्धतीमध्ये सुधारणा झाल्याने या आजाराबद्दल समाजामधील भीती नक्कीच कमी होत आहे. सर्वांनी मिळून एड्सचा सुद्धा मुकाबला करून, निरोगी पिढी निर्माण करूया असे आवाहन सागर तळाशीकर यांनी केले. आरोग्य उपसंचालक डॉ .दिलीप माने म्हणाले, एचआयव्हीला घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेतल्यास आपण यापासून दुर राहू शकतो. एड्सला हरविण्यासाठी तरुणाईचा सहभाग महत्त्वाचा असून तरुणांनी याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन तळागाळापर्यंत पोहोचवावी. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, सातत्याने प्रबोधन आणि जनजागृतीमुळे जिल्ह्याची आकडेवारी लक्षणीय रित्या कमी होत आहे. युवकांनी स्वतःचे एचआयव्ही स्थिती जाणून घेणे काळाची गरज बनली आहे. गरोदर मातेपासून बाळाला होणाऱ्या एचआयव्ही संसर्गाची आकडेवारी गेल्या वर्षात शून्यावर येत आहे ही बाब समाधानकारक असून जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कर्मचारी व स्वयंसेवी संस्था यासाठी प्रयत्नशील आहेत.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, टेक दी राईट पाथ ही या वर्षीच्या एड्स दिनाची थीम असून, एचआयव्हीग्रस्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास सर्वांनी मिळून बळ देणे गरजेचे आहे. एड्स सप्ताहामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा. जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी एड्स मुक्तीची शपथ उपस्थितांना दिली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी ७ डिसेंबर पासून १०० दिवस टी.बी. मुक्ती अभियान राबवले जात असल्याचे सांगून क्षयरोगमुक्तीची शपथ दिली. सीपीआर हॉस्पिटल ते दसरा चौक ते आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छ. शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून प्रभात फेरी संपन्न झाली. रॅलीमध्ये मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, एनएसएस, एनसीसी, स्काऊटगाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सुत्रसंचलन समुपदेशक विनायक देसाई यांनी केले तर आभार मकरंद चौधरी यांनी मानले. यावेळी डी वाय पाटील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच समग्र प्रकल्प कोल्हापूर यांनी तयार केलेल्या एचआयव्ही जागृती पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील एआरटी विभागाचे डॉ. ऋतुजा मोहिते, डॉ. सुभाष जगताप, डॉ. पांडुरंग पाटील यांच्यासह अभिजीत रोटे, राजेश गोधडे, प्रेमजीत सरदेसाई, क्रांतिसिंह चव्हाण, चंद्रकांत गायकवाड, सतीश पाटील, तुषार माळी, संदीप पाटील, दिपक सावंत, संजय गायकवाड, सुजाता पाटील, महेश्वरी करगुप्पी, श्रेया पाटील, मनीषा माने, शिल्पा अष्टेकर व कर्मचारी, यांच्यासह शहरातील नर्सिंग, एन सी सी व एनएसएस महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते होते. फाईव्ह स्टार मानांकन मिळविलेल्या आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मलकापूर, पंचगंगा हॉस्पिटल कोल्हापूर येथील क्रांतिसिंह चव्हाण, चंद्रकांत गायकवाड, सुरेखा जाधव, मीनल पाटील यांचा तर एचआयव्ही संसर्गित रुग्णांसाठी काम करत असलेल्या मालन नौकुडकर, अनिता जाधव, सुरेखा सूर्यवंशी या स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.