कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद (दिव्यांग विभाग) व कोल्हापूर शहरात असणाऱ्या सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगाविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बिंदू चौकातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या हस्ते बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यां साधना कांबळे, कार्यालयीन अधिक्षक अमोल घुगे उपस्थित होते.
रॅलीमध्ये कर्णबधिर, मतिमंद, अंध व अस्थीव्यंग प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांच्या हाती दिव्यांगाविषयी जनजागृती निर्माण करणारे फलक होते. ही रॅली बिंदू चौक, आयोध्या टॉकीज मार्गे दसरा चौक येथे आली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये वि.म. लोहिया कर्णबधिर विद्यालय, चेतना विकास मंदीर, अंधशाळा, स्वयंम मतिमंद मुलांची शाळा व जिज्ञासा मंतिमंद मुलांची शाळा, हॅन्डीकॅप अस्थिव्यंग कार्यशाळा इत्यादी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत रॅलीतील सर्वांना नाष्टा देण्यात आला. रॅलीचे संपूर्ण नियोजन वि.म. लोहीया कर्णबधिर विद्यालय यांनी केले होते. त्यांना जिल्हा समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.