मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा मतदान केल्याबद्दल प्रमाणपत्र देवून सन्मान
कोल्हापूर, दि.20: कोल्हापूर जिल्हयात सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. एकुण 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरळीत सुरूवात झाली. सर्वच ठिकाणी मतदानाचा उत्साह मतदारांमध्ये दिसून येत असून सकाळी सर्वात आधी पहिल्या तासामध्ये अगदी 85 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक विभागाकडून त्या जेष्ठ नागरिकांना मतदान केल्यानंतर प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येत आहे.
जिल्हयात ऐंशी हजाराहून अधिक जेष्ठ नागरिक मतदार यादीत आहेत. त्यापैकी 4430 मतदारांनी गृहमतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. उर्वरीत गृह मतदान नाकारलेले मतदार मतदान केंद्रांवर येत असल्याचे आज सकाळपासूनच दिसून येत आहे. उपस्थित जेष्ठ नागरिकांनी इतर वयोगटातील मतदारांना जणू काही एक आदर्शच घालून दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान करण्याचे आणि जिल्ह्याच्या ऐतिहासिक घटनेचे साक्षिदार होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळी 80 टक्केहून पुढे जात जिल्ह्याची मतदान टक्केवारी राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असेही आवाहन करण्यात येत आहे.