कोल्हापूर,दि.20(जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरु आहे. जिल्ह्यात मतदानादिवशी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदान झाले आहे. मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यामध्ये नवमतदार, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, तृत्तीयपंथी मतदारांनी उत्साहात मतदान केले.
जिल्ह्यातील प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवा मतदारांचा उत्साह अवर्णनीय होता. तर 85 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ मतदारांचा उत्साहही मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, स्वयंसहाय्यक, पिण्याचे पाणी, रॅम्प, आदी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध देण्यात आल्याबद्दल दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण संकल्पानांवर आधारित 143 थिमॅटीक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही मतदान केंद्रे पाहण्यासाठी व येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक व मतदारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्रांवर लावण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट वर छायाचित्रे घेण्यासाठी तरुणांसह वयोवृध्द मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
दरम्यान 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दत्ताबाळ विद्यामंदिर या मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु दिगंबर शिर्के यांनी वाठार तर्फ वडगाव येथे मतदान केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी कसबा बावडा येथील भाऊसो महागावकर विद्यामंदिर येथे मतदान केले. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.