कोल्हापूर :- मध्यप्रदेश मधील नर्मदापुरम येथे झालेल्या सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने रौप्यपदक मिळविले. पाच जणांच्या या संघामध्ये कोल्हापूरच्या दिव्या पाटील व दिशा पाटील या जुळ्या बहिणींचा समावेश होता. दिव्या पाटील संघाची कर्णधार होती. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धा क्लासिकल स्वरूपात स्विस लीग सांघिक पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात घेण्यात आली.
मुलींच्या गटात भारतातील एकूण अठ्ठावीस संघानी भाग घेतला होता. अग्रमानांकित महाराष्ट्रा संघात दिव्या पाटील कोल्हापूर (कर्णधार), अनुष्का कुतवल पुणे, सनिधी भट मुंबई, दिशा पाटील कोल्हापूर व भाविनी मलिक मुंबई या पाच जणींचा समावेश होता. महाराष्ट्र संघाने पहिल्या फेरीत हरियाणा संघाचा दुसऱ्या फेरीत राजस्थान संघाचा तिसऱ्या फेरीत सीबीएससी संघाचा व चौथ्या फेरीत आंध्र प्रदेश संघाचा पराभव करून आठ गुण घेत द्वितीय मानांकित केरळसह संयुक्त आघाडी घेतली होती. पाचव्या फेरीत महाराष्ट्राची व केरळची बरोबरी झाल्यामुळे दोन्ही संघ नऊ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर होते तर तृतीय मानांकित गुजरात संघ आठ गुणांसह द्वितीय स्थानावर होता.अंतिम सहाव्या फेरीत महाराष्ट्रचा संघाचा गुजरात संघा बरोबरचा सामना बरोबरीत सुटला.. तर केरळ संघाने सीआयएसई संघास पराभूत केले. यामुळे द्वितीय मानांकित केरळ संघाने अकरा गुणासह सुवर्णपदक पटकावले तर अग्रमानांकित महाराष्ट्राला संघाला दहा गुणासह रौप्यदकावर समाधान मानावे लागले.तृतीय मानांकित गुजरात संघाला नऊ गुणांसह कास्यपदक मिळाले.
दिव्या पाटील व दिशा पाटील या दोघी जयप्रभा इंग्लिश मेडीयम हायस्कूल व ज्यु.कॉलेज जयसिंगपूर येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत आहेत. त्यांना शाळेच्या प्राचार्या सौ.स्मिता पाटील, क्रीडा शिक्षक राहुल सरडे वडील शरद पाटील,आई कविता पाटील, वैयक्तिक प्रशिक्षक सुमुख गायकवाड, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक प्रवीण ठाकरे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले व सचिव मनिष मारुलकर या सर्वांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.