कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्ट पूर्ती अभियानांतर्गत उद्योग समुह, संस्था, दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेवून निक्षय मित्र बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत इंडो काउंट फाउंडेशनने 650 क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे.
या अनुषंगाने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय, इचलकरंजी येथे प्रातिनिधिक स्वरुपात पोषण आहार कीटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक जबाबदारी म्हणून क्षयरुग्णांना दत्तक घेतल्याबद्दल इंडो काउंट इंडस्ट्रीचे संचालक कमल मित्रा यांचा जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्षयमुक्त भारताची शपथ देण्यात आली. इंडो काउंटच्या कर्मचाऱ्यांनी क्षयरोग जनजागरणपर म्हणी सादर केल्या. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील प्रास्ताविकात म्हणाल्या, टी.बी च्या उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. यामुळे क्षयरुग्णांना पोषण आहार घेणे महत्वाचे आहे. इंडो काउंट फाउंडेशनने 650 क्षयरुग्णांना दत्तक घेत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी इंडो काउंट फाउंडेशनचे कार्य अतूलनिय आहे.
इचलकरंजी महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांनी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाच्या उद्देशाबद्दल माहिती दिली.
यावेळी इंडो काउंट इंडस्ट्रीचे संचालक कमल मित्रा अध्यक्षीय भाषाणात म्हणाले, इंडो काउंट फाउंडेशन सामजिक कार्य व मदतीसाठी सदैव तत्पर आहे. फाउंडेशनने आतापर्यंत सी.पी.आर. हॉस्पिटल, विविध शाळा, आरोग्य संस्थांना मदत केली आहे. यावेळी 650 क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पुढील सहा महिने पोषण आहार पुरवण्यात येईल. सामाजिक जबाबदारी म्हणून फाउंडेशन क्षयरुग्णांच्या पाठीशी सदैव राहील. हा पोषण आहार घेतल्यामुळे क्षयरुग्णांना औषधोपचारासाठी मदत होईल. याच पद्धतीने इतर औद्योगिक संस्था व फाउंडेशनने पुढे येऊन या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
इंडो काउंट फौंडेशनचे सिनिअर सी.एस.आर. कन्सल्टंट अमोल पाटील यांनी इंडो काउंट फाउंडेशनने केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली.
इंडो काउंट फाउंडेशनने रुग्णांना पोषण आहार पुरविल्याबद्दल जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी आभार मानले. शिवाजी बर्गे यांनी सूत्रसंचालन केले तर वैद्यकीय अधिकारी डॉ.मानसी कदम यांनी आभार मानले.
यावेळी आय.जी.एच.हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित सोहनी, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली भाट, फौडेशनचे सिनिअर सी.एस.आर. कन्सल्टंट अमोल पाटील, असि. सी.एस.आर. कन्सल्टंट वैभव कांबळे, डॉ.संदीप मिरजकर आदी उपस्थित होते.