4 डिसेंबरला युवा महोत्सव ; 2 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : येत्या 4 डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे चोख नियोजन करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील अधिकाधिक युवक, युवतींनी युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहात होणाऱ्या कोल्हापूर जिल्हास्तर युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. बैठकीस क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, क्रीडा अधिकारी मनिषा पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, युवा महोत्सवाची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी या महोत्सवाची व्यापक प्रसिध्दी करा. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक- युवती युवा महोत्सवात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करा. तसेच महोत्सवात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आवश्यक त्या सोयी सुविधा द्या.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यस्तर युवा महोत्सवातून निवडक 40 युवक युवतींचा चमू केंद्रीय युवा व खेल मंत्रालयाच्या वतीने आयोजित होणा-या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतो. सन 2024-25 या वर्षीचा युवा महोत्सव क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषी नेहरु युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, कथालेखन, कवितालेखन, वक्तृत्व (हिंदी/इंग्रजी), चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा या स्पर्धा असणार आहेत. तसेच सन 2024-25 या वर्षात “विज्ञान व तंत्रज्ञानातील नवसंकल्पना या संकल्पनेवर आधारित चांगले प्रकल्प, संकल्पना, प्रात्यक्षिक, माहिती यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जैव तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा तंत्रज्ञान इ. विषयांवर युवक, युवतींनी सादरीकरण करणे आवश्यक आहे.
जिल्हा युवा महोत्सव 4 डिसेंबर रोजी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहात घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/fyGtDgVRdowCnXK६ या लिंकद्वारे 2 डिसेंबर, 2024 पर्यंत नाव नोंदणी करावी अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले.