कोल्हापूर दि.29 – सुवर्ण महोत्सवी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सन २०२४ हया दिनांक २९/११/२०२४ ते दिनांक ०५/१२/२०२४ या कालावधीमध्ये पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेकरीता सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा व कोल्हापूर अशा सहा घटकांचे संघ सहभागी होणार असुन स्पर्धेत १२०० पुरुष व महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ दिनांक २९/११/२०२४ रोजी सायंकाळी १७.०० वा. पोलीस परेड ग्राऊंड येथे कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे हस्ते होणार आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचेवरील कामाचा वाढता ताण, बंदोबस्त यामुळे त्यांचे आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात. पोलीस दलावरील ताण कमी करुन पोलिसांना विरंगुळा मिळावा, पोलिसांना आपले क्रीडा कौशल्य व शारिरीक क्षमता दाखवता यावी तसेच पोलीस दलामध्ये सांघिक भावना व खिलाडू वृत्ती विकसित व्हावी याकरिता प्रत्येक वर्षी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. पोलीस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॅन्डबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, जलतरण, कुस्ती, ज्युदो, बॉक्सींग, वेटलिफ्टींग, कबड्डी, खो-खो, तायक्वांदो, पॉवरलिफ्टिींग, क्रॉसकंट्री, बॉडीबिल्डींग इत्यादी वैयक्तिक व सांघिक खेळांचा समावेश होणार आहे.वुशु या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडूंची निवड कोल्हापूर परिक्षेत्र क्रीडा संघात होत असलेने सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून आपली कामगिरी उंचावणेचा प्रयत्न करीत असतात. स्पर्धेतील सर्व क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी करुन सर्वाधिक गुण संपादन करणारे संघास सर्वसाधारण विजेतेपद देण्यात येते. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सन २०२४ – २५ हया ठाणे शहर या ठिकाणी आयोजित करणेत येणार असून या स्पर्धेकरीता कोल्हापूर परिक्षेत्र संघाची निवड या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेतून करणेत येणार आहे.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण व समारोप समारंभ पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचे हस्ते दिनांक ०४ / १२ / २०२४ रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे. या दरम्यान दिनांक ०२/१२/२०२४ रोजी सकाळी पत्रकार व पोलीस अधिकारी यांचेत मैत्रीपुर्ण क्रिकेटचा सामना आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचे बोधचिन्ह कोल्हापूर जिल्हयात आढळून येणारा “गवा’” ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामने पोलीस मुख्यालय कोल्हापूर, छत्रपती शिवाजी विद्यापीठ, शहाजी लॉ कॉलेज, राजर्षि छत्रपती शाहु कॉलेज या ठिकाणी खेळविण्यात येणार आहेत. तरी या क्रीडा स्पर्धेचा व त्यातील उत्कंठावर्धक सामन्यांचा कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.