कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): भारतीय राज्यघटनाकारांनी देशाला संविधान अर्पण केल्याच्या घटनेला येत्या 26 नोव्हेंबर रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाने संविधान सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला असून या निमित्ताने संविधानाचा जागर करणाऱ्या विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांसह जनसंपर्क कक्ष आणि कोल्हापूर प्रेस क्लब हेही या उपक्रमांत सहभागी होणार असून शिवाजी विद्यापीठातर्फे मानव्यशास्त्र सभागृहात आयोजित या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह समाजातील सर्वच घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक तथा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी दिली आहे.
संविधान सप्ताहाचा संक्षिप्त कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, 10.45 वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर संविधानाधारित पथनाट्य सादरीकरण, 11 वाजता कै. डॉ.ग.गो. जाधव अध्यासन इमारतीमध्ये भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमे या विषयावर गोलमेज परिषद, दुपारी 2.30 वाजता कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली सप्ताहाचा औपचारिक उद्घाटन समारंभ होणार आहे.
बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित भारतीय संविधानिक मूल्ये आणि शिक्षण या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन, 11 वाजता भारतीय संविधान आणि विकसित भारत या विषयावर डॉ. श्रीरंजन आवटे (पुणे) यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.
गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता या विषयावर डॉ. सुरेंद्र जोंधळे यांचे व्याख्यान होणार असून व्याख्यानानंतर लगेचच संविधान साक्षरता या विषयावर विशेष निमंत्रितांची चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भारतीय संविधानाचे आजच्या भारतासाठीचे महत्त्व या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.
शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहाच्या समारोप समारंभ प्रसंगी डॉ. रविनंद होवाळ यांचे भारतीय संवैधानिक मूल्ये या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दि. 26 नोव्हेंबरपासून ‘भारतीय संविधान निर्मिती’ या विषयावरील चित्रफीतींचे शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार असून त्यावर आधारित विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धाही या निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे.