कोल्हापूर: दिनांक १२/११/२०२४ रोजी पहाटे ०५.१५ वाजता तावडे हॉटेलचे हायवे ब्रिजवर व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे, रा. बागल चौक, कोल्हापूर यांना ५ लोकांच्या टोळीने निवडणूक व्हिजीलन्स अधिकारी आहोत, आचार संहिता सुरू असून रोख रक्कम जवळ ठेवू शकत नाही. असे सांगुन फिर्यादीस गाडीमध्ये बसवून सरनोबतवाडी, ता. करवीर येथे घेवून जाऊन त्यांचेकडील २५,५०,०००/- रूपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार दिलेने गांधीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४८० / २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४, ३१८ [४], ३१९ [२], ३१० [२], ३ [ ५ ] प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सध्या विधानसभा निवडणूक २०२४ ची आचार संहिता लागु असून त्यामध्ये निवडणूक व्हिजीलन्स अधिकारी असल्याचा बनाव करून रक्कम लुटल्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत , यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणणेकरिता सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील ० २ पोलीस अधिकारी व २० अंमलदार यांची ०६ तपास पथके नेमून सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. सदर टोळीने व्यावसायिकास नियोजनबध्द लुटले असलेने व कोणतेही धागेदोरे मिळत नसलेने सदरचा गुन्हा उघडकीस आणणे आव्हानात्मक बनले होते. पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बामीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी व त्याचे साथीदार यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची विश्वसनीय बातमी मिळाली तसेच ते गुन्हा केलेनंतर गोवा येथे गेले असल्याचे समजले. त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक जालींदर जाधव व त्यांचे पथक तात्काळ गोवा येथे रवाना झाले. तपासा दरम्यान नमुद आरोपी गोवा येथुन कोल्हापूरच्या दिशेने परत येत असल्याची माहिती मिळालेने स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. चेतन मसुटगेव पथकाने राधानगरी ते कोल्हापूर रोडवर पुईखडी या ठिकाणी १] संजय महावीर किरणगे, वय ४२ वर्षे, २] अभिषेक शशिकांत लगारे, वय २४ वर्षे, ३] विजय तुकाराम खांडेकर, वय २८ वर्षे, सर्व रा.कोल्हापूर यांना गुन्हा करतेवेळी वापरलेल्या टाटा हॅरियर व निसान गाडीसह ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्ह्यात आणखी ०२ आरोपी असून त्यांची नावे स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव व हर्षद खरात असून ते सध्या कोठे आहेत याबाबत माहिती नसल्याचे सांगीतले.
तसेच हर्षद खरात व स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव यांना सदर व्यावसायिक हा कर्नाटक येथुन परत कोल्हापूर येथे रक्कम घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा कट रचल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या ०३ आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५ लाख रूपये रोख रक्कम तसेच ‘गुन्ह्यात ‘वापरलेल्या टाटा हॅरियर गाडी क्र. KA – ३३ Z – ५५५० किंमत रू. २० लाख व निसान मॅग्नेट गाडी क्र. MH – ०९ -GA – ६२५९ किंमत रू. १० लाख असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. ०२ आरोपी यांचे शोधसाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल गांधीनगर पोलीस ठाणेस जमा केला असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स. पो. नि. चेतन मसुटगे, पोलीस उप निरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदिप पाटील, महेंद्र कोरवी, प्रविण पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, विशाल खराडे, कृष्णात पिंगळे, शुभम संकपाळ, सागर माने, लखन पाटील, अमित मर्दाने, अमित सर्जे, अमर वासुदेव, हिंदुराव केसरे, दिपक घोरपडे, प्रशांत कांबळे, संजय हुंबे, महेश खोत, महेश पाटील, सुरेश पाटील, समीर कांबळे, संजय कुंभार, चालक सुशिल पाटील व यशवंत कुंभार यांनी केलेली आहे.