कोल्हापूर दिनांक 15 – कोल्हापूर उत्तरमध्ये आता आरोप प्रत्यारोप फैरी झडताना दिसत आहेत.पेठपेठांत कोपरा सभांमुळे वातावरण तापू लागले आहे.त्यातच काल शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख संजय पवार यांनी जुना बुधवार पेठ येथे झालेल्या सभेमध्ये “कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत घोसाळकर पार्ट – 2 होणार” असे वक्तव्य केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.निवडणूक कशी लढवायची नसते हे सांगून घोसाळकर आज हयात नसले तरी ते “घोसाळकर पॅटर्न” म्हणून आजही लोकांच्या स्मरणात आहेत.1990 साली कोल्हापूर शहर मध्ये विधानसभा निवडणुकीला सुरेश घोसाळकर निवडणूक लढवत होते. त्यांच्याविरुद्ध दिलीप देसाई हे रिंगणात होते.त्यावेळेस घोसाळकर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यावेळच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर झाल्याचे समजून येते.त्यावेळी सर्व नेते मंडळी यांना आता घोसाळकर निवडून येणार अशी खात्री होती.मात्र त्या नेत्यांना कोल्हापूरच्या जनतेची नाडी ओळखता आली नाही.त्यावेळी प्रचंड पैशाचे वाटप करण्यात आल्याचे बोलले जाते.परंतु ज्यावेळी निकाल लागला तो धक्कादायक होता आणि त्यामध्ये सुरेश घोसाळकर यांचा पराभव होऊन दिलीप देसाई यांनी निवडणूक जिंकली होती.पैशाच्या जीवावर ही “गल्ली पॅक ती गल्ली पॅक” करणाऱ्या कार्यकर्त्यांसह घोसाळकर यांनाच जनतेने “शेवटी पॅक” केल्याचा इतिहास आहे.त्याचाच संदर्भ पकडून संजय पवार यांनी विरोधी उमेदवार पैशाचे प्रचंड वाटप करत असून त्यांचा घोसाळकर पार्ट – 2 होणार असल्याचे भाकित केले असून येणाऱ्या 23 तारखेला कोणाचा घोसाळकर होणार याचा निकाल लागणार हे निश्चित.त्यामुळे आजकाल पैश्याच्या जोरावर निवडणुका लढवण्याचा ट्रेंड पडला आहे की काय ? असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला असला तरी जनता “ऐकावे जनाचे करावे मनाचे” करत असते हे मात्र नक्की.