कोल्हापूर, दिनांक 14 (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका तयार केली आहे. या पूर्वपीठिकेचे आचारसंहिता सुरू झाल्यापासून चार वेळा नवनवीन माहितीसह पीडीएफ स्वरूपात प्रसिद्धी करण्यात आली होती. आता अंतिम छापील पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन समारंभास माध्यम प्रमाणीकण व सनियंत्रण समितीचे सदस्य अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी अतूल आकुर्डे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.येडगे म्हणाले की, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची अंतिम पूर्वपिठिका प्रकाशित केली आहे. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असा आहे. निवडणुकीचे वार्तांकन करणाऱ्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडीया यासारख्या माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना ही पूर्वपीठिका संदर्भ पुस्तिका म्हणून उपयुक्त ठरेल.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. अडसूळ म्हणाले, विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करतांना माध्यमांना मागील निवडणुकीचे संदर्भ वेळोवेळी लागतात. या पूर्वपीठिकेत विविध स्वरुपाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये 1971 ते 2019 पर्यंतच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते, मतदानाशी निगडीत आकडेवारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासह महत्वाचे अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, जिल्ह्यातील एकूण मतदार, मतदान केंद्र आदि माहिती समाविष्ठ करण्यात आली आहे.