कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “कर्तव्य” या चित्रफितीचे अनावरण आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ.के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी एस.कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी सचिन अडसूळ, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे मतदान 80 टक्क्यांहून अधिक होण्यासाठी स्वीप (SVEEP) अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. साधारण 3 मिनीटांची असलेली “कर्तव्य” ही चित्रफित चित्रपटगृहे, एलईडी स्क्रीन तसेच सोशल मीडियात प्रसारीत करण्यात येणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन या चित्रफितीव्दारे करण्यात आले आहे.