निवडणूक विषयक कर्तव्य पार पाडताना सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना समान वागणूक द्या
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : निवडणूक कालावधीत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, ही संवेदनशील स्वरुपाची जबाबदारी असून सर्वांनी समन्वयाने काम करावे. शासनाच्या सर्व विभागाचे निवडणूक कर्तव्यार्थ कार्यरत अधिकारी, कर्मचारी हे निवडणूक आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर असून कर्तव्यकसुरी झाल्यास त्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणावी. निवडणूक विषयक कोणतेही कर्तव्य पार पाडताना भेदभाव न करता सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना समान वागणूक द्यावी, असे निर्देश 271 ते 280 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य), (खर्च) व (पोलीस) यांनी दिले.
विधानसभा मतदार संघ 271 ते 280 चे निवडणूक निरीक्षक (सामान्य) व निवडणूक निरीक्षक (खर्च) तसेच निवडणूक निरीक्षक (पोलीस यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, स्थिर निरीक्षण पथकांचे प्रमुख व भरारी पथकांचे प्रमुख यांची व्ही.सी. मार्फत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, प्रशिक्षण नोडल अधिकारी श्रीमती किरण कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता व्यवस्थापन नोडल अधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी संजय तेली, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा निवडणूक खर्च परिक्षण पथक प्रमुख अतुल आकुर्डे उपस्थित होते.
यावेळी 273 व 274 विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक अशोक कुमार, 275 व 276 विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक मीर तारीक अली, 279 व 280 विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक विश्व मोहन शर्मा, ना.पो.से. निवडणूक निरीक्षक (पोलीस) अर्णव घोष, 271 ते 276 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्च निरीक्षक आर. गुलजार बेगम व 277 ते 280 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक दिनेश कुमार मीना यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच FST व SST पथकांना सजगपणे काम करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. येडगे म्हणाले, निवडणूक निरीक्षक यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.