कोल्हापूर ,ता.१२(वार्ताहर) : केंद्रीय शिवसेना पक्षाचे उपनेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समितीच्या सदस्यपदी फेरनिवड करण्यात आली आहे. याची यादी केंद्र शासनामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
दरम्यान,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय वस्त्रोद्योग समितीच्या सल्लागार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील माने यांना देशाचे केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीने इचलकरंजीसह राज्यातील वस्त्रोद्योगासमोर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. खा. माने यांच्याबरोबर महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्या सुनेत्रा पवार यांनाही संधी देण्यात आली आहे.
या समितीवर परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्घेरिटा, विधी व न्याय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल, सूचना प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह लोकसभेतील 8 तर राज्यसभेतील 4 खासदारांचा समावेश आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह महायुती मधील सर्व नेत्यांचे आभार मानले.