कोल्हापूर, दि.8 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक स्वतंत्र वेबसाईट तयार केली असून त्याच्या माध्यमातून मतदारांना ऑनलाईन प्रतिज्ञा घेता येणार आहे. या वेबसाईटचे अनावरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात करण्यात आले. या वेबसाईटवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्वप्रथम ई-मतदार प्रतिज्ञा घेतल्यामुळे त्यांना हे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकशाही दौडसाठी तयार केलेल्या टी शर्ट चे अनावरण जिल्हाधिकारी श्री. येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेयन व जिल्हा उपनिबंधक तथा स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी निळकंठ करे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या स्वीप टीम मार्फत मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम जिल्हाभर राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने ही वेबसाईट तयार केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, प्रत्येक निवडणूकीमध्ये उच्चांकी मतदान करण्याची परंपरा कोल्हापूर जिल्हयाची असून यावेळेस देखील ती परंपरा कायम ठेवून राज्यात उच्चांकी मतदान कोल्हापूर जिल्हयाचे होण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून मतदारांना अगदी सोप्या पध्दतीने ऑनलाईन प्रतिज्ञा घेता येणार आहे. मतदारांनी प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांनी प्रतिज्ञा घ्यावी व मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार असून, मतदारांनी देखील स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देवून ई-मतदार प्रतिज्ञा घेण्यासाठी स्वयंप्रेरित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनी केले.
मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे व याचा निश्चितच फायदा मतदानाची टक्केवारी वाढीमध्ये होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितले.