कोल्हापूर, दि. 07 (जिमाका): जिल्ह्यामध्ये अवैध मद्य निर्मिती वाहतुक व विक्री विरुध्द विशेष मोहीम राबवून दिनांक १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२४ अखेर आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत एकुण १५१ गुन्हे नोंदविले आहे. यामध्ये १४७ आरोपींना अटक करण्यात आली असून यात १२ वाहने जप्त केली असून एकुण ४० लाख १० हजार ८२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द यापुढेही नियमित कारवाई सुरु राहणार आहे. त्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात यईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी आवाहन केले आहे.
संपूर्ण निवडणूक कालावधीत परराज्य निर्मित अवैध मद्य वाहतूक, साठवणूक, विक्री, आयात निर्यात तसेच मळी, ताडी याची बेकायदेशीर विक्री होवु नये तसेच विधानसभा निवडणुक भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी जिल्ह्यामध्ये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर या कार्यालयाकडून एकुण ९ विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच ४ आंतरराज्य व ४ आंतरजिल्हा सिमा तपासणी नाके निर्माण करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील मद्य निर्मिती, ठोक मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या तसेच सर्व किरकोळ मद्य विक्रीच्या अनुज्ञप्तीमधुन होणाऱ्या दैनंदिन मद्य विक्रीवर लक्ष ठेवण्यात येत असुन आक्षेपार्ह काही आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे.
निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून, दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवस, दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व दिनांक २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या घाऊक व किरकोळ मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-२, एफएल-२. सीएलएफएल/टिओडी-३, एफएल-३, एफएल/विआर-२, सीएल-२, सीएल-३, फॉर्म-ई, फॉर्म ई-२, एफएल-४) बंद ठेवण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.
जिल्हाधिकारी, बेळगावी यांनी महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून दिनांक २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत व दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या सीमेपासून कर्नाटक राज्याच्या ५ कि. मी. हद्दीतील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.