कोल्हापूर दिनांक 1 – विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा जवळपास 15 कोटींचा भ्रष्टाचाराचा बॉम्ब ऐन दिवाळीत फुटणार का? याची चर्चा नागरिकांत रंगलेली दिसून येत आहे.देवस्थान समिती अंतर्गत हजारो मंदिरे आणि शेकडो एकर जमीन तसेच इतर मालमत्ता यांचा समावेश आहे.तसेच अंबाबाई मंदिर व्यवस्थापन सुध्दा याच समितीकडे येते.त्यामुळे इकडे “मलईदार” पद मिळवण्यासाठी सर्वच इच्छुक असतात.त्याअनुषंगाने या विभागांतर्गत भ्रष्टाचाराचे अनेक आरोप यापूर्वी झाले आहेत.परंतु त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.त्यातीलच एक भाग म्हणून शासनाने ठरविलेला नोकरभरती बाबतचा आकृतीबंध धाब्यावर बसवून 2010 पूर्वी च्या समितीने बेकायदेशीरपणे जवळपास 20 लोकांची भरती केली असून त्यांच्यावर अंदाजे 15 कोटी रुपयांची पगारापोटी लूट केल्याचे सबळ पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिल्या गेलेल्या अहवालात सदरची भरती बेकायदेशीर असल्याचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.मग त्याबाबत कारवाई न करता त्या अहवालाला कचऱ्याची टोपली कोणी दाखवली हा संशोधनाचा विषय आहे.मग मर्जीतल्या लोकांना नातेवाइकांना बेकायदेशीरपणे सेवेत घेऊन जनतेच्या पैशाची बेकायदेशीर लूट करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? हा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने रीतसर देवस्थान समितीच्या सचिव यांच्याकडे तक्रार अर्ज केला असून त्याबाबत निर्णय प्रलंबित आहे.परंतु संघटना गाफील न राहता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत असून संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी करून झालेल्या भ्रष्टाचाराच्या रकमेच्या वसुलीसह तत्कालीन समितीच्या अध्यक्ष सचिव यांच्यासह सर्व सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार असल्याचे समजते.याबाबत देवस्थान समितीच्या वेगवेगळ्या प्रकरणाबाबत क्रमशः मालिका आजपासून सुरू करण्यात येत आहे.यामध्ये कोण कोण आपल्या पोळ्या कशा भाजत आहे आणि भ्रष्टाचार कसा केला जात आहे याची पोलखोल होणार आहे.