कोल्हापूर, दि. ०१ : भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.
त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.