कोल्हापूर, दि.28 (जिमाका) : जिल्ह्यातील निवडक उप आरोग्य केंद्रांना रेफ्रीजरेटर खरेदी करण्यासाठी केंद्र निवडीची प्रक्रिया तातडीने करावी, हिपॅटॅायटीस सी किट खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तातडीने तयार करुन सादर करावा, ऊसतोड हंगाम सुरु होत असल्याने ऊस तोडीसाठी येणाऱ्या मजुरांना आरोग्य सेवा उपलब्ध होतील. यासाठी उपाययोजना कराव्यात, जिल्ह्यात 179 तृतीयपंथी असून त्यांचे 100 टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच इतर समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे पुढे म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांची एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी प्राधान्याने करुन घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. वेश्या व्यवसाय करणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात येतील. जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागाला देण्यात आलेले उदिष्ट्य पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक गतीने काम करुन जास्तीत जास्त आरोग्य सेवा देण्याच्या प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.