276 कोल्हापूर उत्तर मतदार संघातील 67 मतदान केंद्रावर पुरविण्यात येणा-या मुलभूत सुविधांची केली पडताळणी
कोल्हापूर दि. 28 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने होणाऱ्या मतदानावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र रागेंच्या व्यवस्थेसह पुरेशी सावली, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर उभारावी. असे निर्देश निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली (IAS) यांनी दिले.
मीर तारीक अली (IAS) यांनी 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भेट देऊन विविध निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेतला. यावेळी 276 कोल्हापूर उत्तर मतदार संघातील 67 हून अधिक मतदान केंद्रावर पुरविण्यात येणा-या मुलभूत सुविधांची पडताळणी केली. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणूक निर्भय भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, निवडणूकीचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच खुल्या, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात नि:पक्षपणे निवडणुका पार पाडण्याबाबत नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
या भेटीदरम्यान मतदार संघातील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ व मतदान केंद्र कर्मचारी उपस्थित होते.