कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या वतीने धर्मादाय विभागाच्या सह आयुक्त निवेदिता पवार यांच्या संकल्पनेतून गतवर्षी प्रमाणे यंदाही दिपावलीचे औचित्य साधून समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या कोल्हापूर विभागातील स्वंयसेवी संस्थांच्या विश्वस्तांचा सत्कार व गौरव समारंभ पार पडला.
या कार्यक्रमात आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी, सावली सोशल सर्कल, कोल्हापूर, आस्था चॅरिटेबल इन्स्टिट्यूट, मातोश्री वृध्दाश्रम, आर.के.नगर, कोल्हापूर, कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन, कोल्हापूर, कागल तालुका कला, क्रिडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, वजीर एज्युकेशन ॲण्ड सोशल फौंडेशन, अनंतशांती सामाजिक बहूउद्देशीय संस्था, कोल्हापूर, निळकंठेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी, जाणीव फौंडेशन, कोल्हापूर, कोकणकला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग, भारतीय कष्टकरी रयत संस्था, आगवे, रत्नागिरी, कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकीपालवण, रत्नागिरी, श्री दानम्मादेवी गुड्डापूर, सांगली, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदाश्रम, सिंधुदुर्ग व वृध्द सेवाश्रम, सांगली या न्यासांचा सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे मोफत आरोग्य शिबिरात उत्कृष्ट सेवा बजावणा-या कोल्हापूर येथील 22 रुग्णालयांच्या प्रतिनिधींचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार म्हणाल्या, ज्या संस्थांनी मनोभावे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून आपले सेवा कार्य केले आहे त्यांचा सत्कार करणे हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे. ज्याप्रमाणे स्वर्गीय पद्मविभूषण रतन टाटा यांनी त्यांच्या लोकांप्रती सेवाभावी वृत्तीने प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले त्याप्रकारे सर्व सेवाभावी संस्थांनी त्यांचा तसेच उत्कृष्ट काम करणा-या इतर संस्थांचा आदर्श व प्रेरणा घेऊन समाजाप्रति समर्पित भावनेने कार्य केले पाहीजे.
धर्मादाय उप आयुक्त का.रा.सुपाते-जाधव यांनी संस्थांनी कसे कार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कार्यालयीन कर्मचारी विधिज्ञ, विविध स्वंयसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.