•स्वीप नोडल तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस
•मतदार जनजागृतीबाबत नियोजन बैठकीत कार्यक्रमाबाबत चर्चा
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी 71.98 टक्के मतदान केले. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत 74.11 टक्के मतदान झाले. यावेळी विधानसभेला जिल्ह्यातील सर्व दहा मतदार संघात 80 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी स्वीप अंतर्गत जनजागृतीला गती देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप कार्तिकेयन एस. यांनी सांगितले. मतदार जनजागृती कार्यक्रमांच्या नियोजनाच्या अनुषंगाने विविध विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बुधवारी संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यात कमी मतदान झालेल्या 322 मतदान केंद्रांमध्ये बॅनर लावणे, विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या आई वडीलांना पत्र लिहून मतदानाची विनंती, लोकशाही दौड, सायकल रॅली, प्रभातफेरी, “लोकशाहीसाठी देऊ योगदान, गावाकडे जाऊन करु मतदान” अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या बैठकीला सहायक नोडल स्वीप निलकंठ करे, प्राथमिक व माध्यमिक विभाग, महिला व बालविकास, रेल्वे, राज्य परिवहन, विमान अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मतदार जनजागृतीसाठी शासनाच्या विविध विभागाकडून करावयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्याचे ठरले. यामध्ये जिल्ह्यामध्ये गतवेळच्या राज्य सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या 322 मतदान केंद्रांमधील 3 ठिकाणे, क्षेत्रे निश्चित करुन त्या ठिकाणी गतवर्षीच्या कमी मतदान झाल्याची बाब प्रकर्षाने निदर्शनास आणून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठीचे त्या आशयाचे बॅनर्स लावण्यात यावेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील व अन्य सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनी मतदान करावे यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई वडीलांना पत्र लिहून विनंती करावयाची आहे. हे पत्र शक्यतो इंडलँड लेटरचा वापर करुन लिहीण्यात यावे व ते पोस्टाद्वारे पालकांना पाठवावयाचे आहे अशा सूचना देण्यात आल्या. कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा, गारगोटी या प्रत्येक ठिकाणी लोकशाही दौडचे आयोजन होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी मिशन ८०+ असा उपक्रम राबवून मतदानाचा लक्षांक निश्चित करण्यात आला असून त्यासाठी 80 सायकलपटू 80 किमीचा प्रवास सायकलद्वारे करुन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 टक्के पेक्षा अधिक मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील कमी मतदान टक्केवारी असलेल्या ३२२ मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये विध्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शालेय विध्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. जिल्ह्यातील 12 एस. टी. स्टँड आवारामध्ये प्रत्येकी 2 फ्लेक्स लावून एस. टी. स्टँडवरील साउंड सिस्टीम यंत्रणेद्वारे मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक बसमधील कंडक्टरनी प्रवाशांनी मतदान करण्याविषयी प्रबोधन करुन व प्रवाशांकडून मतदान करण्याविषयी प्रतिज्ञा करुन घेण्याचा उपक्रम राबिवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या रेल्वे स्टेशन आवारामध्ये फ्लेक्स लावण्यासह रेल्वे स्टेशनवरील साउंड सिस्टीम यंत्रणेद्वारे मतदानाचे आवाहन करुन रेल्वे स्टेशनवर मतदान जनजागृतीबाबतचे वेळोवेळी जिंगल्स प्रसारीत करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर विमानतळावरुन बाहेरगावी जाणाऱ्या तसेच कोल्हापूर शहरात येणा-या प्रवाशांसाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहेत. विमान कंपनीतर्फे विमानामध्ये बसलेल्या प्रवाशांसाठी मतदान करण्याविषयी आवाहन करण्या बरोबरच विमानतळावरील डिजीटल बोर्ड यंत्रणेमध्ये मतदान करण्याबाबतचा संदेश प्रसारीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघांमध्ये 15 मतदान केंद्रांची निवड करुन निवड केलेल्या मतदान केंद्राची त्या ठिकाणानुसार नाविन्यपूर्ण संकल्पना तयार करून ही केंद्रे दि. 18 नोव्हेंबर रोजी सायं. 5 वाजण्यापूर्वी संकल्पनेनुसार तयार करुन त्याबाबत प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कमी मतदान टक्केवारी असलेल्या 322 मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये किमान 3 भेटींद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे कामकाज होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील कामानिमित्त परगावी असलेल्या मतदारांशी संपर्क साधून “लोकशाहीसाठी देऊ योगदान, गावाकडे जाऊन करु मतदान” अभियान राबविण्यात येणार. जीएसटी व इन्कम टॅक्स विभागाने करदाते तसेच त्यांचे संलग्न असणारे त्यांचे कर्मचारी, कामगार यांची सभा घेवून तसेच एस एम एस प्रणालीद्वारे संदेश पाठवून मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मतदान जनजागृतीबाबतचे व्हीडीओ तयार करुन हे व्हीडीओ विधानसभा मतदार संघातील क्षेत्रात प्रसारीत केले जाणार आहेत.
ज्या मतदान केंद्रामध्ये गत विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा 25 टक्के पेक्षा अधिक, 20 टक्के ते 25 टक्के व 15 ते 20 टक्के इतकी वाढ मतदानामध्ये झाली आहे त्यांचा गौरव करणे. मतदान केंद्रावर असलेल्या एकूण मतदानाच्या 90 टक्के पेक्षा अधिक मतदान झाल्यास त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. एम. आय. डी. सी. क्षेत्रातील सर्व उद्योजकांची सभा घेवून त्यांच्याकडील सर्व कामगारांचे मतदान जास्तीत जास्त होईल याबाबत मार्गदर्शन नियोजन आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांसाठी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व पोलीस अधिक्षक यांचा संयुक्त फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित करुन त्याद्वारे शंकांचे निरसन करुन मतदारांना जास्तीत जास्त मतदानाचे आवाहनही केले जाणार आहे.