•जिल्ह्यात 271 ते 276 विधानसभा मतदारसंघाच्या खर्च निरिक्षक श्रीमती आर गुलजार बेगम, आयआरएस तसेच 277 ते 280 विधानसभा मतदारसंघाचे दिनेश कुमार मीणा, आयआरएस दाखल
•जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च अनुषंगिक विविध नोडल अधिकाऱ्यांचा घेतला आढावा
कोल्हापूर, दि.24 : निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसेच वन विभागाने सजग राहून छुप्या मार्गाने होणारे व्यवहार तसेच वाहतूक रोखावी अश्या सूचना खर्च निरिक्षक दिनेश कुमार मीणा यांनी केल्या. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबरला प्रसिद्धी पत्रकान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यात एका टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज स्विकारण्याची अंतीम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात 271 ते 276 विधानसभा मतदारसंघाच्या खर्च निरिक्षक श्रीमती आर गुलजार बेगम, आयआरएस तसेच 277 ते 280 विधानसभा मतदारसंघाचे दिनेश कुमार मीणा, आयआरएस दाखल झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात खर्च अनुषंगिक विविध नोडल अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.
निवडणूक खर्च निरीक्षकांनी खर्च अनुषंगिक सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाचे निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे निर्देश खर्च निरीक्षकांनी दिले. निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी लेखा पथके, निरीक्षण पथके, भरारी पथके, व्हिडीओ देखरेख पथके, तसेच लेखा, कॅश, बँक रजिस्टर, विवरणपत्रे, शॅडो रजिस्टर, माध्यम खर्च संनियंत्रण अहवाल, प्राप्तीकर विभाग, तसेच बँकांकडून प्राप्त अहवाल आदींबाबत माहिती खर्च निरीक्षकांनी यावेळी यंत्रणेकडून घेतली.
यावेळी बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील खर्च संनियंत्रणासाठी लेखा पथके, निरीक्षण पथके, भरारी पथके, व्हिडीओ देखरेख पथके याबाबत माहिती दिली. खर्च विभागाचे नोडल यांनी सनियंत्रण व लेख्यांबाबत माहिती दिली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आचारसंहिता संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, अति.पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, खर्च नोडल अधिकारी अतुल आकुर्डे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहलता श्रीकर नरवणे, लीड बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, माध्यम कक्षाचे नोडल सचिन अडसूळ उपस्थित होते.
तक्रार निवारण, मतदार मदत कक्षास भेट
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे पहिल्या मजल्यावर जिल्हास्तर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच त्याच ठिकाणी मतदार मदत कक्ष कार्यरत आहे. या ठिकाणी दोन्ही खर्च निरिक्षकांनी भेट देवून कामकाजाबाबत माहिती घेतली. 1950 या टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या तक्रारी तसेच मतदार मदतीबाबतची कार्यवाही केली जाते. सी-व्हीजील ॲपवरील तक्रारीही याठिकाणी नोंदवून त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाते. याठिकाणी दिलेल्या भेटीवेळी खर्च नोडल अधिकारी अतुल आकुर्डे, सहायक नोडल तक्रार निवारण कक्ष प्रासद संकपाळ यांनी माहिती दिली.