ग्रामसेवक ते सहाय्यक आयुक्त असा प्रवास
वारणानगर, ता.१८: बहिरेवाडी ( ता. पन्हाळा ) गावचे सुपुत्र व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सतीश अरुणराव जाधव यांची नवी मुंबई महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्या या निवडीबद्दल बहिरेवाडीसह वारणा परिसरातूंन त्यांचे अभिनंदन होत आहे.
सतीश जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी माध्यमिक व उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. आईवडील दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करायचे त्यांच्या बरोबरीने त्यांनी शेतमजूरीचे काम करत आपले शिक्षण पूर्ण केले.सुरुवातीला नऊ वर्षे ग्रामसेवक म्हणून सेवा. त्यानंतर पाच वर्षे विटा येथे पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून राज्य शासनाच्या कृषी अधिकारी पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे प्रभावी काम केले. त्यानंतर गेली दोन वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली असून या काळात शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात मोलाची भूमिका पार पाडली. त्यांची नुकतीच नवी मुंबई येथील महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य लाभले.