कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग नजीक गॅस गळती होऊन लागलेली आग आटोक्यात आणत आपत्कालीन मदत आणि बचाव कार्याचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) घेण्यात आले. अवघ्या पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणून जखमींना मदत करीत व बिघाड झालेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करीत एचपी ऑइल कंपनीच्या आपत्कालीन बचाव व मदत कार्य विभागातील कर्मचाऱ्यांनी वेगवान मदत कार्याचे सूत्रबद्ध प्रात्यक्षिक सादर केले.
प्रात्यक्षिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, सुशांत सुतार डीआयएसएच व एचपी ऑइल गॅस पुरवठा कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. सुरुवातीस गस्त पथकास विनापरवाना त्रयस्त व्यक्तीकडून गॅस पाईपलाईनवरच खोदाई काम सुरु असल्याचे लक्षात आले आणि त्याचवेळी गॅसची मोठ्या प्रमाणावर गळती सुरु झाली व थोड्या वेळात तेथे आग लागली. गस्त पथकातील कर्मचाऱ्याने तात्काळ घटनेची माहिती एसआयसीला दिली व अपघाताच्या ठिकाणची वाहतूक वळवली. कंट्रोल रुमकडून कोल्हापूर अग्निशमन दल, एमआयडिसी अग्निशमन, कागल पोलिस ठाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, अॅब्युलंन्स व इतर संबंधित यंत्रणांना तात्काळ मदतीचे आवाहन केले. घटनास्थळी ऑक्झिलरी टीम दाखल होते. पाईपमधून होणारा गॅस पुरवठा खंडित करते. आग लागलेल्या ठिकाणी बॅरिकेट लावले जातात, जवळपासच्या लोकांना दूर होण्यासाठी आवाहन करते. त्यानंतर रेस्क्यू टीम दाखल होते व अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीस प्रथमोपचार करुन अॅब्युलंन्सद्वारे हॉस्पिटलला रवाना करते. कर्मचारी छोटा सिलिंडरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु, आग मोठी असल्याने ही साधने तोकडी पडतात. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान दाखल होतात व शास्त्रीय पद्धतीने मोहीम सुरु करत काही मिनिटांतच आग पूर्णपणे आटोक्यात आणली जाते. त्यानंतर मेंटेनन्स टीम मशीनद्वारे हवेमध्ये असलेला गॅस तपासत शून्य असल्याची खात्री झाल्यानंतर पाईपलाईन दुरुस्ती हाती घेते. थोड्याच वेळात पाईप दुरुस्त होते. काम फत्ते होते व धोका टळल्याचे जाहीर केले जाते.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, सुशांत सुतार यांच्यासह सुरक एकल कारखाना निरीक्षक, कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य अग्नीशमन अधिकारी मनीष रणभिषेक, एमआयडीसी कागलचे अग्निशमन अधिकारी मिनिस सोनवणे, शिरोलीचे पोलीस इन्सपेक्टर रविंद्र गायकवाड, कोल्हापूर नॅशनल हायवेचे असीस्टंट प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत बर्डे, नॅशनल हायवेचे व्यवस्थापक गोविंद भैरव उपस्थित होते.