मुंबई, दि. 15 : लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे समग्र वाङ्मय हा विद्वत्तेच्या क्षेत्रातील अनमोल ठेवा आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक त्यांच्या कार्याविषयीचे साहित्य 18 खंडांमध्ये एकत्रित केले असून नवीन पिढीने अशा साहित्यिकांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी केले.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन डॉ.मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या चर्चेत डॉ.लवटे आणि डॉ.अशोक चौसाळकर हे चर्चक म्हणून सहभागी होते.
डॉ.मोरे म्हणाले, वाचकांनी दर्जेदार साहित्य वाचावे यासाठी अशी साहित्य निर्मिती होणे आणि ती वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळ सातत्याने असा प्रयत्न करीत असून यापुढे देखील अशी उत्तमोत्तम विषयांवर आधारित साहित्य निर्मिती केली जाईल. मंडळाकडे अतिशय कमी मनुष्यबळ असताना देखील दर्जेदार साहित्य प्रकाशित होत असल्याबद्दल कौतुक करुन साहित्य प्रेमींचे प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ.लवटे यांनी तर्कतीर्थांवरील 18 खंड हे प्रचंड कार्य असल्याचे सांगून यासाठी हजारो हातांनी संदर्भ पुरविल्याचे सांगितले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्य जीवनाविषयीचे विविध पैलू उलगडून सांगताना त्यांनी भाषण आणि इतर साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिण्यासाठी कधीच नकार दिला नसल्याचे तथापि पुस्तक परिक्षण मात्र ते अतिशय चोखंदळपणे करीत असल्याचे डॉ.लवटे यांनी नमूद केले. तर्कतीर्थांवरील 18 खंडांच्या प्रकाशनासाठी साहित्य आणि संस्कृती मंडळासह शासकीय मुद्रणालयाचे आभार व्यक्त केले. विश्वकोश मंडळाच्यावतीने मराठी विश्वकोशाचे लेखन कसे झाले याबाबतचे दस्तऐवज संग्रहित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ.चौसाळकर यांनी देखील तर्कतीर्थ आणि त्यांच्या साहित्याबाबत माहिती दिली. डॉ.लवटे यांनी केवळ 3-4 वर्षात त्यांचे कार्य एकत्रित करुन हे प्रचंड कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याचप्रमाणे राजारामशास्त्री भागवत तसेच आचार्य जावडेकर यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. मंडळामार्फत आतापर्यंत 688 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. मंडळामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकावर वाचन प्रेरणा दिनानिमित्त चर्चा केली जाते, त्यानुसार आज तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.